नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘सेलिब्रिटी वाघीण’ अशी ओळख असलेल्या ‘माया’ वाघिणीच्या अधिवास क्षेत्रात एका वाघाचा सांगाडा सापडला. त्यामुळे पुन्हा एकदा या वाघिणीच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात येणार असून त्यानंतरच हा सांगाडा कोणत्या वाघाचा आहे, हे कळू शकेल. मात्र, ही ‘माया’च असावी, अशी दाट शक्यताही वनखात्याच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन पावसाळ्यानंतर एक ऑक्टोबरला सुरू झाले. मात्र, ‘ताडोबाची राणी’ अशीही ओळख असलेली १३ वर्षाची ‘माया’ ही वाघीण पर्यटकांना आतापर्यंत दिसली नव्हती. २५ ऑगस्टला ती शेवटची पंचधारा या लोकेशनवर मंजुरांना दिसली होती. तिच्या मृत्यूची चर्चा सुरू झाल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. तब्बल १२५ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. या व्याघ्रप्रकल्पातील पांढरपौनी हे तिचे अधिवास क्षेत्र. मायाचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी, १७ नोव्हेंबरला तीन दिवसांची पायी गस्त आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यात वनखात्याचे १०० हून अधिक कर्मचारी सहभागी होते. जवळपास १०० चौरस किलोमीटर क्षेत्र पालथे घातल्यानंतर तिच्याच अधिवासात शनिवारी, कर्मचाऱ्यांना वाघाच्या हाडाचा सापळा आढळला. त्यामुळे ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या चर्चेला उधाण आले. दरम्यान, बंगळुरू येथील प्रयोगशाळेत डीएनए विश्लेषणासाठी नमुने पाठवले जाणार असून त्यानंतरच मृत्यूचे कारण आणि वाघाची ओळख पटणे शक्य होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tiger skeleton was found in the tadoba andhari tiger project nagpur rgc 76 amy