नागपूर : वाघांच्या अधिवासात पर्यटकांनी घुसखोरी सुरू केली. वाघाच ते.. ऐकणार थोडे आणि मग वाघांनीही त्यांच्या अधिवासातील पर्यटकांच्या विश्रामगृहात घुसखोरी केली. एवढेच नाही तर चक्क वामकुक्षीसाठी विश्रामगृहाचा परिसर निवडला. त्याच्या या कृतीतून त्याने पर्यटकांना जणू इशाराचा दिला. ‘तुम्ही आमच्या अधिवासात घुसखोरी केली, तर आम्हीही आमच्याच अधिवासातील तुमच्या विश्रामगृहात घुसखोरी करु’. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या तुरीया प्रवेशद्वाराजवळील एका ‘रिसॉर्ट’च्या परिसरात हा प्रसंग घडला.

भारतातील सर्वच व्याघ्रप्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. यात भारतातीलच नाही तर भारताबाहेरील पर्यटकदेखील मोठ्या संख्येने येतात. केवळ आणि केवळ व्याघ्रदर्शनासाठी ते या व्याघ्रप्रकल्प परिसरातच मुक्काम ठोकतात. त्यामुळे आता सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या निवासासाठी रिसॉर्ट तयार होत आहे. आतापर्यंत पंचतारांकित हॉटेल्स असायचे, पण आता रिसॉर्टदेखील पंचतारांकित आहेत. त्यातून लाखो रुपयांची कमाई रिसाॅर्टमालक करत आहेत, तर स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे. मात्र, या व्यवसायाची मुळे एवढ्या झपाट्याने पसरत आहे, की त्यांना वाघाचा अधिवास कमी पडू लागला आहे. अनेकठिकाणी नियमबाह्य रिसॉर्ट उभी आहेत. त्यामुळे वाघांनी त्यांचा मोर्चा या रिसॉर्टकडे वळवला आहे.

हेही वाचा – “प्रशासनाचा धाक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना”, राज ठाकरेंचे वक्तव्य; म्हणाले, “न्यायालयात प्रकरण दाखल केली की…”

महाराष्ट्रात देखील रिसॉर्टच्या परिसरात वाघाने त्याचा मोर्चा वळवल्याचे चित्र कित्येकदा दिसून आले आहे. त्यामुळे आमच्या रिसाॅर्टमध्येही व्याघ्रदर्शन होते असे सांगून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तर हे नियमबाह्य रिसॉर्ट उभे केले जात नाही ना, असाही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हे पर्यटकांच्या जीवावरही बेतू शकते, हे लक्षात घेतले जात नाही. आतापर्यंत रिसॉर्टच्या जवळपास वाघांच्या भ्रमंतीचे काही व्हिडिओ समाजमाध्यमावर दिसून आले. मात्र, मध्यप्रदेशातील या छायाचित्राने चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…

मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील तुरिया प्रवेशद्वाराजवळील एका रिसॉर्टच्या परिसरात वाघ भ्रमंती करुन गेला नाही, तर त्याने चक्क त्याठिकाणी वामकुक्षी घेतली. ऐन दुपारच्यावेळी वाघाने याठिकाणी मुक्काम ठोकल्याने पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. रिसॉर्टच्या परिसरातील एका झाडाखाली झोपलेला वाघ पाहून एक क्षण पर्यटकांचीही बोबडी वळाली. मात्र, थोड्याच वेळात तो त्याच्या मूळ अधिवासाकडे निघून गेला, पण या वाघाने जणू त्यांना इशाराच दिला की यापुढे आमच्या अधिवासात घुसखोरी कराल तर खबरदार!