चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात ३१ जुलै रोजी आष्टी काकडे या गावातील शेत शिवारात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. या वाघाच्या मृत्यूचे गुढ आता उलगडले असून या वाघाच्या मारेकऱ्यास वन विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे. मनोहर डोमा कुळमेथे (६३), राहणार आष्टी काकडे, ता. भद्रावती असे आरोपीचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर या वाघाचा मृत्यू विद्युत धक्का लागून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वनविभागाने या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर शेतात लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन या वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीने आपल्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी तार लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. या ताराचा स्पर्श होऊन वाघाचा मृत्यू झाला. ३१ जुलै रोजी सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोपीने या वाघाचा मृतदेह शेतापासून दूर शिवारात नेऊन टाकला होता. या घटनेचा तपास वन विभाग करीत होता. अशातच आरोपी मनोहर कुळमेथे याला ताब्यात विचारपूस केली असता जिवंत विद्युत प्रवाह सोडल्याची कबुली दिली. वन विभागाने कुळमेथे याला अटक केली आहे.