कविता नागापुरे
भंडारा : मागील सहा महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मोहघाटा जवळील भुयारी मार्गाचे काम कुठवर आले ? हे पाहण्यासाठी अखेर खुद्द वाघालाच यावे लागले. दोन दिवस वाघाने बांधकामावर लक्ष ठेवले! आता तरी त्याच्या भ्रमण मार्गाचे काम लवकर पूर्ण होईल का ? असा प्रश्नच जणू तो विचारून गेला.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली राष्ट्रीय महामार्ग ५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग ६) वरील वन्यजीव भुयारी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची ओरड नागरिक करीत आहे. अशातच मोहघाटाजवळ बांधकामाच्या ठिकाणी सलग दोन दिवस वाघ दिसल्याने महामार्गावरून ये जा करणारे आणि बांधकाम कंपनीचे मजूर अडचणीत आले.
हेही वाचा >>>वर्धा: संमेलनाध्यक्षनाच मंचावर पोलिसांची आडकाठी ! कन्या भक्ती चपळगावकर यांची जाहीर नाराजी
नागझिरा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील वाघांच्या भ्रमण मार्ग परिसरात वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्याची मागणी करण्यात आली होती. वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदित्य जोशी यांच्या अहवालानंतर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मोहघाटसह मध्य भारतातील पाच वन्यजीव भ्रमण मार्गामध्ये भुयारी मार्ग बांधण्यास सुरुवात केली आहे. नवेगाव, उमरेड पवनी करांडला, मेळघाट, पेंच, बोर, सातपुडा, कान्हा आणि ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला हा भ्रमण मार्ग जोडतो. सिरपूर नवाटोला, मरमजोब- डोंगरगाव, बाम्हणी- डुग्गीपार आणि साकोली- मुंडीपार अशा ठिकाणी भुयारी मार्ग बांधले जातील.
याबाबत वाइल्ड वॉच फाउंडेशनचे शैलेंद्र सिंग राजपूत म्हणाले की, बांधकामाच्या ठिकाणी वाघ दिसल्याने हे सिद्ध होते की, हा एक वन्यप्राण्यांचा भ्रमण मार्ग आहे. त्यामुळे महामार्गांवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर या भुयारी मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी पर्यावरण बहुउद्देशीय संवर्धन संस्थेचे अझहर हुसेन यांनी केली आहे. हुसेन यांनी सांगितले की, अलीकडेच २३ हत्तींच्या कळपानेही याच मोहघाटा भ्रमण मार्गामधून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून नागझिराला जाण्याचा प्रयत्न केला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये एका बिबट्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. या भुयारी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत किती वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागेल, हे माहीत नाही, अशी भीती हुसेन यांनी व्यक्त केली आहे.
हा भ्रमणमार्ग वनविकास महामंडळाच्या अधिनस्थ असून त्यांनी तो वन विभागाला हस्तांतरित करावा तसेच नागझिरा बफर झोनचां त्यात समावेश करावा, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी केली आहे.