नागपूर : जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा कोळसा खाणीत रविवारी रात्री अनेकांना व्याघ्रदर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीसह आश्चर्याचा धक्का बसला.शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ही कोळसा खाण आहे.
रविवारी रात्री या कोळसा खाणीत वाघ रस्त्यावर फिरताना दिसून आला. हा वाघ खाणीजवळ पोहोचला आणि कोळसा खाण परिसरात वाहनांसमोर फिरू लागला. वाघाला पाहताच उपस्थित लोक घाबरले. मात्र, काही वेळ तेथे फिरल्यानंतर वाघ स्वतःहून निघून गेला. हा वाघ सुमारे तीन ते साडेतीन वर्षांचा असावा, असा अंदाज आहे.
हेही वाचा >>>मेडिकल, मेयो, आयुर्वेदमधील १ हजार कोटींच्या प्रकल्पांवर मंथन
वेकोलिने येथे सुमारे ४५० हेक्टर जमीन घेतली असून येथे कोळशाचे उत्खनन केले जाते. लगतच उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य असल्याने हा वाघ तेथूनच आला असावा, अशी शक्यता आहे. खाणीचे काम जवळजवळ पूर्ण झाले असले तरीही व्याघ्रदर्शनामुळे खाण कर्मचाऱ्यांमध्ये मात्र भीती आहे. वाहनातून जाणाऱ्या अनेकांना वाघ दिसल्याने त्या वाघाला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.