प्रसव वेदनांनी ‘ली’ प्रचंड विव्हळत होती, पण तिच्या प्रसूतीशी त्यांना काहीच देणेघेणे नव्हते. पूर्वानूभव गाठीशी असूनही त्यांना जणू ‘ली’च्या मातृत्वापेक्षा माजी उपमुख्यमंत्र्यांसमोर त्यांची कर्तबगारी सिद्ध करायची होती. शेवटी व्हायचे तेच झाले आणि पुन्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चौथ्यांदा ‘ली’च्या बछडयाचा बळी गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा करोना चाचणीला विरोध; नागपूर महापालिकेची डोकेदुखी वाढली

अवघ्या महिनाभराची असताना ‘ली’ आणि तिचे भावंड(जान व चेरी) आईपासून दुरावले. त्यांना महाराजबाग प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले आणि तेथेच ते लहानाचे मोठे झाले. या प्राणीसंग्रहालयात ‘ली’ ही वाघीण ‘साहेबराव’ या वाघापासून गर्भवती राहिली. पहिल्यांदा येथे तिच्या बछडयाचा बळी गेला. त्यानंतर तिला गोरेवाड्यातील बचाव केंद्रात आणले. तेथेही ती ‘साहेबराव’ पासून गर्भवती राहिली. मात्र, अनुभव गाठीशी नसल्याने तिच्याच चुकीमुळे तिने चारही बछडे गमावले. त्यानंतर प्रशासनाने काळजी घेणे अपेक्षित होते. नंतर ‘ली’ला गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात आणले आणि येथे ‘राजकुमार’ या वाघापासून ती गर्भवती राहिली. तिच्या पोटातून पहिला बछडा बाहेर पडला आणि त्याला उचलताना डोक्याला मार लागून तो मृत पावला. येथेही प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला. प्राणीसंग्रहालयाची जबाबदारी अभिरक्षकावर असताना तिच्या प्रसूतीच्या वेळी तर तो हजर नव्हताच, पण या अननुभवी अभिरक्षकाने तिच्या आणि बछड्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही तयारी केलेली नव्हती. त्यानंतर ती पुन्हा ‘राजकुमार’ पासून गर्भवती आहे हे ठाऊक असताना ‘ली’च्या एकूणच हालचालीवर गोरेवाडा प्रशासनाचे २४ तास लक्ष असायला हवे होते. विशेषकरुन तिच्या सोनोग्राफीनंतर तिच्या मातृत्त्वाची विशेषत्त्वाने काळजी घ्यायला हवी होती. मात्र, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि अभिरक्षकाचा अति आत्मविश्वास नडला. तज्ज्ञ पशुवैद्यकांची मदत न घेता अननुभवी कंत्राटी अभिरक्षकावर भरवसा ठेवून प्रशासन काम करत राहिले.

हेही वाचा- अमरावती: अन् पत्रकाराच्‍या प्रश्‍नावर अजित पवार भडकले

दोन दिवसांपूर्वीच ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते आणि ते खरे ठरले. शनिवारी सकाळी तिला प्रसववेदना सुरू झाल्या तेव्हा तिच्याजवळ कुणीही नव्हते. रात्रीचे वनमजूर सकाळी सात वाजता निघून गेले होते आणि त्यानंतर गोरेवाडा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्राणीसंग्रहालयाला भेट देणार म्हणून सकाळी साडेसात वाजतापासून त्यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होते. नेमके त्याचवेळी ‘ली’ला प्रसूतीकळा सुरू झाल्या त्यावेळी वनमजुराशिवाय दुसरे कुणीही नव्हते. तब्बल दोन तासांनी अजित पवार गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडल्यानंतर अधिकारी व अभिरक्षक ‘ली’च्या पिंजऱ्याकडे निघाले. ‘ली’ने सकाळी एक तर दुपारी अडीचच्या सुमारास दुसऱ्या बछड्याला जन्म दिला, पण ते ही मरण पावले. याबाबत गोरेवाड्याचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असताना प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा- अमरावती : नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी संयुक्त अभियान राबवा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश

दोषींवर कारवाई व्हावी

‘ली’ या वाघिणीबाबत आधीचे अनुभव बघता पुन्हा असे झाल्यास ती नैराश्यात जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे गोरेवाडा प्रशासनाने आणि विशेषकरुन प्राणीसंग्रहालयाच्या अभिरक्षकाने पूर्ण तयारीत असणे गरजेचे होते. मुळात पूर्वानुभव बघता तिला पुन्हा गर्भधारणेसाठी तयार करणे हे मानसिक छळ करण्यासारखे आहे. ती गर्भवती राहिल्यानंतर पर्यटनापासून पूर्णपणे दूर सुरक्षित ठेवणे आवश्यक होते. मात्र, पर्यटन परिसरातच तिला ठेवण्यात आले. यात गोरेवाडा प्रशासन जेवढे दोषी आहे, त्यापेक्षाही अधिक दोष प्राणीसंग्रहालयाच्या अभिरक्षकाचा आहे. त्यामुळे त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tigress named lee has lost her calf for the fourth time at the maharaj bagh zoo in nagpur rgc 76 dpj