नागपूरः नागपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत ६ विधानसभा मतदार संघात एकूण २ हजार १०५ तर रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत ६ विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार ४०५ मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. या दोन्ही मतदार संघात आतापर्यंत ४२ लाखांवर मतदारांची नोंदणी झाली असून १९ एप्रिलला मतदान होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
निवडणुकीसंदर्भात प्रशासनाच्या सज्जतेसह विस्तृत माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रपरिषदेत डॉ. इटनकर बोलत होते. ते म्हणाले, या दोन्ही मतदारसंघासाठी स्ट्राँग रुम आणि मतमोजणीची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमना येथे करण्यात येणार आहे. एकूण ७ हजार ५७३ अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>विश्लेषण : देशातल्या पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का? काय आहे तिचे महत्त्व?
पोलीस विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक मतदानाचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी ‘मिशन डिस्टिंगशन’ सर्व मतदारांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंग आणि ८५ वर्षांवरील वयोवृद्ध मतदार, अत्यावश्यक सेवावरील कर्मचारी- अधिकारी, निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी- कर्मचारी, पोल पर्सोनेल, पोलीस पर्सोनेल अशा मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी या सगळ्यांना १२/१२ अ, १२ ड क्रमांकाचा अर्ज भरावा लागेल, असेही इटनकर यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी संपूर्ण निवडणूक काळातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील तयारीबाबत तर सौम्या शर्मा यांनी पेडन्यूजबाबत प्रसारमाध्यमांनी घ्यावयाची काळजी आणि माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीशी संपर्कसाधून या संदर्भातील नियम समजून घेत चुका टाळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तुषार ठोंबरे, प्रवीण महिरे, विनोद रापतवार उपस्थित होते.
हेही वाचा >>>आदर्श आचारसंहिता म्हणजे काय? ती कधी लागू होते अन् उल्लंघन केल्यास काय होतं, वाचा ‘हे’ नियम
निवडणूक कार्यक्रम असा….
नागपूर आणि रामटेक मतदारसंघासाठी २० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. २८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्जांची छानणी होईल. ३० मार्च अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होईल. ६ जूनपर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही डॉ. इटनकर यांनी सांगितले.
शेजारच्या राज्यातील अधिकाऱ्यांसोबत समन्वय
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघाची निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून दोन्ही मतदारसंघाला लागून असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या सिमेवरील जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांशी समन्वय केला जात असून काही बैठकीही झाल्या आहे. त्यामुळे तेथील व येथील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे, मद्य तस्करीसह इतर गुन्ह्यांवरही अंकूश लावले जात असल्याचेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात निवडणूकीसाठी २० हजार बॅलेट मशिन, ११ हजार ३० कंट्रोल युनिट, ११ हजार २४५ कंट्रोल युनिट प्रस्तावित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
लोकसभासंघनिहाय मतदार
१६ मार्च २०२३ ची स्थिती
मतदारसंघ पुरुष महिला तृतीयपंथी एकूण
नागपूर ११,११,२९८ ११,०७,७२४ २२२ २२,१९,२४४
रामटेक १०,४३,६०१ १०,०२,७८० ०५४ २०,४६,४३५
एकूण २१,५४,८९९ २१,१०,५०४ २७६ ४२,६५,६७९