ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या ‘जिप्सी’मधील एक पर्यटक काही अंतरावर माया वाघीण आणि तिचे बछडे असतानाच जिप्सीखाली कोसळल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे काही वेळ पर्यटकांचा थरकाप उडाला होता. माया वाघीण व तिच्या बछड्यांचे छायाचित्र काढण्याच्या नादात पर्यटक कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सहकारी पर्यटकांनी त्याला वेळीच खेचल्याने पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बनावट यादीमुळे गोंधळ; बदल्या पुढे ढकलण्याची शक्यता
ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्प हमखास व्याघ्रदर्शनासाठी जगप्रसिद्ध आहे. रविवारी ताडोबाच्या कोअर झोनमध्ये सकाळी जिप्सींना प्रवेश देण्यात आला. पांढरपौनी भागात माया वाघीण तिच्या बछड्यांसह जिप्सीसमोर आली. तेथे हजर सर्व पर्यटकांच्या नजरा मायावर खिळल्या. मात्र, अशातच नागपूर येथील पर्यटक किशोर कान्हेरे जिप्सीतून खाली कोसळले. यामुळे कान्हेरेंसह इतर पर्यटकांच्या हृदयाचा ठोका चुकला. कान्हेरेंचे नशीब बलवत्तर म्हणून की काय, सोबतीला असलेल्या पर्यटकांनी लगेच त्यांना खेचल्याने मोठा अनर्थ टळला.
माया वाघीण अचानक जिप्सीच्यासमोर आली असता चालकाने ब्रेक दाबल्यामुळे कान्हेरेंचा तोल गेल्याचे काही जण सांगत आहेत. मात्र, माया वाघीण व तिच्या बछड्यांचे छायाचित्र काढण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पर्यटक व वन्यजींवाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वृत्ताला ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनीही दुजोरा दिला आहे. पर्यटनादरम्यान पर्यटक व जिप्सी चालकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.