वाशीम : जिल्ह्यातील एका नामांकित निवासी शाळेत आदिवासी मुली शिक्षण घेत आहेत. परंतु येथे मुलींना दररोज जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. जेवणात शिळे अन्न व भाजी ऐवजी चटणी दिली जात असल्याने विद्यार्थिनींनी भाजी मागितली म्हणून चक्क मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
आदिवासी मुलींना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत इतर जिल्ह्यातील आदिवासी मुलींना प्रवेश दिला जातो. ही शाळा एका मोठ्या राजकीय व्यक्तीची असून त्या शाळेत मुलींना नियमित जेवण मिळत नसल्याने, त्यांनी शाळा प्रशासनाला तशी मागणी केली. जेवणात भाजी ऐवजी त्यांना चटणी खावी लागत होती. म्हणून त्यांनी चटणी खाण्यास विरोध केला असता शाळेतील शिक्षिकेने मुलींना मारहाण करीत रात्रीच्या वेळी एका चार चाकी गाडीत कुठलीही महिला कर्मचारी सोबत न देता घरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसा व्हिडिओ समोर आला असून विद्यार्थिनी त्या मध्ये व्यथा मांडत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील काही मुलींनी याबाबत आमदार राजकुमार पटेल यांची भेट घेत त्यांच्या समोर ही समस्या मांडून न्यायाची मागणी केली आहे. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक यांना संपर्क साधला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. या गंभीर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून प्रशासन याबाबत काय कारवाई करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.आमच्याकडे माहिती आली आहे. परंतु नेमका काय प्रकार आहे. यांची माहिती घेऊन योग्य ती पावले उचलू, अशी माहिती प्रकल्प अधिकारी व्यवहारे यांनी दिली.