लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला: ४१ डिग्री अं.से. तापमानामध्ये अंग भाजत असतांना एका आदिवासी महिलेची चक्क सिमेंटच्या रस्त्यावर प्रसुती झाल्याची धक्कादायक व मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडली. तीव्र उन्हात रस्त्यावर बाळाचा जन्म झाल्याने यंत्रणेच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सुदैवाने परिसरातील महिला मदतीसाठी धावून आल्याने महिलेची सुखरुप प्रसुती झाली. आता बाळासह त्या महिलेला अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरक्षित मातृत्वासाठी शासन विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, ग्रामीण भागातील परिस्थितीत अद्यापही सुधारणा झाल्या नाहीत. आजही तळागाळापर्यंत सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. याचा प्रत्यय वाडेगाव येथील घटनेवरून येतो. वाशीम जिल्ह्यातील मुंगळा या गावतील एक कुटुंब कामासाठी वाडेगावातील एका शेतात आले होते. महिला गरोदर होती, अचानक पोट दुखू लागल्याने गरोदर महिला पतीसोबत वाडेगाव येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेली. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला थांबण्यास सांगितले. महिलेला वेदना असाह्य झाल्या.

हेही वाचा… चार दिवसाच्या बाळाची चोरी; चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील प्रकार

शेत मालकाने एका ऑटो चालकाला तत्काळ पाठविले व महिलेला पुढील उपचारांसाठी नेण्याचे प्रयत्न केले. महिलेला कळा सुरू झाल्या. परिसरातील महिलांच्या लक्षात येताच त्या रणरागिणी धावून आल्या. महिलेला साड्यांच्या कपड्यामध्ये झाकले अन् त्यामध्येच भर उन्हात महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी अकोल्यात पाठविण्यात आले.
या सर्व प्रकारामध्ये खासगी डॉक्टरने बेजबाबदारपणा केल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनीही सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tribal woman gave birth to a baby on a concrete road in the hot sun in akola ppd 88 dvr
Show comments