मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वान वनपरिक्षेत्राअंतर्गत वारी येथील वान धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या एका आदिवासी तरुणाला वन कर्मचाऱ्यांनी गरम सळाखीने चटके देऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. या आदिवासी तरुणाला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

अंकुश गोरेलाल मावस्कर (२५, रा. धुळघाट रेल्वे) असे जखमी युवकाचे नाव आहे. अंकुश हा गावातीलच आनंद कास्देकर आणि पप्पू चव्हाण या दोन सहकाऱ्यांसोबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत वान वनपरिक्षेत्रातील वान धरणावर गेले होते. त्यांनी मासेमारीसाठी जाळे टाकले. या धरणावर मासेमारी प्रतिबंधित आहे. अवैध मासेमारी केल्याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुमारे सात ते आठ कर्मचाऱ्यांनी मारहाण करून गरम सळाखीने चटके दिल्याचा आरोप अंकुश मावस्कर याने केला आहे.

राणीगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वहीद खान पठाण यांनी जखमी अंकुशला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती वहीद खान पठाण यांनी दिली. गरम सळाखीचे चटके दिल्यानंतर आपण जखमी अवस्थेत कशीबशी वनकर्मचाऱ्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि जंगलातून गावी परतल्याचे अंकुश मावस्कर याचे म्हणणे आहे. दुसरीकडे, अंकुशला वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, अवैध मासेमारी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आरोपींची चौकशी व्हावी, आणि अंकुशला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Story img Loader