नंदा खरे यांनी मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा सूक्ष्म तपशीलानिशी व तेवढ्याच तटस्थपणे अवलोकन करीत समाजातील विषमता आणि अज्ञानाच्या विरोधात प्रदीर्घ लेखन केले. साहित्य आणि विज्ञानाची अशक्य वाटणारी सांगड घालत त्यांनी साहित्यातले बहुस्तरीय पदर वाचकांपुढे उघड केले. आज त्यांच्या निधनाने मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा विचार मांडणारी लेखणी कायमची हरपली.

नंदा खरे मूळ नागपूरचे. शिवाजी नगरातील त्यांच्या घरी जसा कायम लेखकांचा राबता असायचा तसाच तरुण विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीचेही ते केंद्र होते. ‘सत्य दाबून ठेवण्याचा प्रकार सर्वकाळात कमी-जास्त प्रमाणात सुरुच असतो. प्रत्येकवेळी कुणीतरी खरे बोलण्याची गरज असते. जोपर्यंत सत्य बोलत राहण्याची गरज आहे, तोपर्यंत मी लिहित राहणार आहे,’ अशी भावना ते सातत्याने व्यक्त करायचे. या भावनेला अनुसरूनच कृती त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केली. अनंत यशवंत ऊर्फ नंदा खरे हे मूळ नाव. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता. त्यांची व्यावसायिक कारकीर्द यशस्वी राहिली. त्यांनी जसे महाराष्ट्रातील अनेक वीज प्रकल्प, धरणे, पूल, कारखाने उभारण्यास मदत केली तसेच आपल्या लिखाणातून समाजाला वैचारिक नेतृत्वही प्रदान केले. माणसाच्या रोजच्या जीवन मरणाची निरीक्षणे टिपून त्यातली आर्तता अतिशय कौशल्याने लेखणातून व्यक्त केली. खऱ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ या काळात त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण घेतले. २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते स्थापत्य अभियंता होते. शैली आणि आशयाच्या दृष्टीने ‘अंताजीची बखर’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. त्याशिवाय वीसशे पन्नास, वारुळपुराण, कहाणी मानवप्राण्याची, जीवोत्पत्ती आणि नंतर, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य, ज्ञाताच्या कुंपणावरून, यासह इतर अनेक पुस्तके प्रकाशित झाली. ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ या त्यांच्या आत्मचरित्राचीदेखील वाचकांनी मोठ्या उत्सुकतेने दखल घेतली. १९९३ ते २०१७ दरम्यान त्यांनी ‘आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. १९८४ ते १९९१ या कालखंडात खरे यांनी मराठी विज्ञान परिषदेला सहकार्य केले.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

अन् साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारला!

२०२० साली खरे यांच्या ‘उद्या’ या गाजलेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु, त्यांनी हा पुरस्कार नाकारला. त्यावेळी खरेंच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली होती. राजकीय कारणातून त्यांनी हा निर्णय घेतला का, याबाबतही मोठी चर्चा रंगली होती. परंतु, नंतर खरे यांनीच याबाबत खुलासा केला होता. माझ्या या निर्णयामागे कुठलेही राजकीय कारण नाही. समाजाकडून भरपूर मिळाले आहे आणि यापुढेही काही स्वीकारत राहणे मला इष्ट वाटत नाही, त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

खरे यांना मिळालेले पुरस्कार

  • ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ या हस्तलिखितास १९८५ साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यासाठीचा द्वितीय पुरस्कार.
  • ‘वीसशे पन्नास’ या विज्ञान कादंबरीस १९९५ साली विदर्भ साहित्य संघाचा गो.रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार.
  • ‘कहाणी मानवप्राण्याची’ या मानवशास्त्रविषयक ग्रंथास २०१० साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार.
  • एकूण कादंबरीलेखनासाठी २०१४ साली ‘शब्द: द बुक गॅलरी’ या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार.
  • ‘उद्या’ या कादंबरीला २०१५ साली लोकमंगल साहित्य पुरस्कार.

प्रमुख प्रतिक्रिया

नंदा खरे साहित्य क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. ते मूळचे नागपूरकर होते. नागपुरातील सोन्यासारखा माणूस गेला. साहित्यिक म्हणून त्यांचे मोठे योगदान होते. कुठल्याही माणसाने पुस्तक उचलले आणि नंदा खरेंचे पुस्तक कळले असे होत नाही. त्यांचे लेखन स्वतंत्र प्रतिभेतून आणि स्वतंत्र विचार शैलीतून जन्मले होते. -महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार.

नंदा खरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. दिलदार माणूस आणि चांगला विचारवंत गेला. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले. -डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ साहित्यिक.

नंदा खरे यांच्या निधनाने अगदी जवळचा माणूस गेला. बोलणे फार कठीण झाले आहे. खरे हे खऱ्या अर्थाने बुद्धिमान मराठी माणसांचे लेखक होते. त्यांनी मूल्यांशी कधी तडजोड केली नाही. -रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ, ज्येष्ठ साहित्यिक.