‘घनतमी शुक्र बघ राज्य करी’ या काव्यपंक्तीप्रमाणे सद्यस्थितीत पश्चिम आकाशात सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह अधिराज्य गाजवत आहे. पृथ्वी, चंद्र व शुक्र ग्रह एका रेषेत येत असल्याने २४ मार्चला सायंकाळी ४.१७ ते ५.५१ या वेळेत सुमारे दीड तास हा ग्रह पिधान अवस्थेत असताना तो चंद्रबिंबाआड झाकला जाईल. ही एक प्रकारची ग्रहण स्थिती असते. मात्र, ही खगोलीय घटना सूर्य प्रखर प्रकाशाने पिधानानंतर पश्चिम आकाशात संधी प्रकाश असताना सुद्धा पाहता येईल. चंद्रकोरीजवळच शुक्र ग्रह दिसेल, अशी माहिती विश्वभारतीचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
हेही वाचा >>>बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी, चंद्रपूर जिल्ह्यात २८ एप्रिलला निवडणूक
सध्या शुक्र ग्रह अत्यंत तेजस्वी असून त्याची दृश्यप्रत उणे चार आहे. या ग्रहाचे स्थान पृथ्वी सूर्याच्या मधात असल्याने याचे उदय व अस्त पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर होतात. त्यामुळेच त्याला सायंकालीन किंवा प्रभातकालीन तारा समजतात. ‘कार्बनडाय ऑक्साईड’च्या ढगांमुळे याला बुरख्यातील सुंदरी देखील म्हणतात. या ढगांमुळे सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित होऊन हा ग्रह ठराविक वेळी भरदिवसा दुपारी पण नुसत्या डोळ्यांनी पाहता येतो. अंतर्ग्रह असल्याने याच्या कलांचे दर्शन दुर्बिणीतून घेता येते. असे केल्यास एकाचवेळी पश्चिम आकाशात दोन चंद्राचे दर्शन घेता येईल. त्यापैकी एक चंद्र चैत्र शुद्ध तृतीयेचा व दुसरा चंद्र शुक्राच्या एकादशीच्या चंद्रकोरीसारखा दिसेल. जुलैमध्ये हाच शुक्र पुन्हा असाच पाहता येईल. चंद्र-शुक्राचा लपंडावाचा खेळ अनुभवण्याचे आवाहन विश्वभारती संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.