नागपूर : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात सापडलेल्या अपंग मुलीला (रूपा) समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांनी स्वत:चे नाव देत तिचे पालन केले. रुपाची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले गेले. येथे तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून येथे सर्वच डॉक्टर तिच्यावर विशेष लक्ष देत आहेत. रक्षाबंधनाला रुपाने मेडिकलच्या निवासी डॉक्टरांना राखी बांधली.
रुपा ही पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठी पोलिसांना सापडली होती. बाल न्यायालयाच्या आदेशानुसार तिला पोलिसांनी स्व. अंबादास पंत वैद्य दिव्यांग बालगृहात दाखल केले. शंकरबाबांनी तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शंकरबाबांच्या प्रयत्नाने तिला नगरपालिका अचलपूर, येथे नोकरी लागली. सर्व काही सुरळीत असताना रुपाची प्रकृती खूपच खालावली. तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.
हेही वाचा – पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर, वीज कंपन्यांची चिंता वाढली
हेही वाचा – नागपुरात दोन डेंग्यू संशयितांचा मृत्यू! रुग्णसंख्या ३०० पेक्षा जास्त
मेडिकलच्या शल्यक्रिया विभागात मार्डचे पदाधिकारी व निवासी डॉक्टर असलेले डॉ. शुभम महल्ले व डॉ. अक्षय घुमरे दोघेही रुपावर विशेष लक्ष देत होते. रक्षाबंधनाच्या दिवशी रुपाने दोघांनाही राखी बांधत मेडिकलमधील चांगल्या उपचाराबाबत आभार व्यक्त केले. तर पहिल्या दिवशीपासून रुग्णाची काळजी घेणाऱ्या डॉ. मुरारी सिंग यांनाही रुपाने राखी बांधली. रुपाच्या उपचारावर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार विशेष लक्ष देत आहेत.