नागपूर : खोदकाम करताना सोन्याचे दागिने असलेला हंडा मिळाल्याची बतावणी करून अमरावतीतील एका भाजी विक्रेत्या दाम्पत्याची तीन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. फसवणुकीची ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी शुभांगी सुरेश गुल्हाने (३७) रा. नांदगाव खंडेश्वर, अमरावतीच्या तक्रारीवरून तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.
शुभांगी आणि त्यांचे पती सुरेश अमरावतीच्या नांदगाव परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. २३ जुलैला दोन आरोपी त्यांच्या दुकानात आले. राजापेठ परिसरात खोदकाम करताना सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला हंडा मिळाल्याची बतावणी केली. तसेच घरी लग्न आहे. पैशांची आवश्यकता असल्याने लवकरात लवकर दागिने विकून घरी जायचे आहे. जर कंत्राटदाराला याबाबत समजले तर त्यांना काहीही मिळणार नाही, अशी थाप मारली.
हेही वाचा >>>नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…
सोने खरे असल्याची खात्री पटविण्यासाठी आरोपींनी सुरेश यांना दोन मणी दिले आणि फोन नंबर देऊन संपर्क करण्यास सांगितले. सुरेश यांनी मणी तपासले असता ते खरे होते. त्यानंतर अशोक कराडे नावाच्या व्यक्तीने सुरेश यांच्याशी संपर्क केला. कंत्राटदाराने नागपूरला बोलावले असल्याची माहिती दिली आणि लवकरात लवकर सोने घेऊन जाण्यास सांगितले.
३० जुलैला सुरेश आणि शुभांगी नागपूरला आले. आरोपींनी त्यांना कॉटन मार्केट येथील एका ज्वेलर्सजवळ भेटायला बोलावले. ते दोन पुरुष आणि एक महिला आरोपी उपस्थित होते. आरोपींनी लाल रंगाच्या पिशवित लाखो रुपयांचे सोने असल्याची माहिती दिली. गुल्हाने दाम्पत्याने त्यांना ३ लाख रुपये दिले. आरोपींनी आसपास कॅमेरे असल्याची माहिती देत लवकर पिशवी घेऊन निघण्यास सांगितले. गुल्हाने दाम्पत्य पिशवी घेऊन घरी आले. ५ दिवसानंतर सराफाकडे जाऊन आरोपींनी दिलेली सोन्याची माळ तपासली असता ती बनावट निघाली. त्यांनी अमरावती पोलिसात तक्रार केली. मात्र, फसवणूक नागपुरात झाल्याने प्रकरण गणेशपेठ पोलिसांकडे पाठविण्यात आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा >>>गडचिरोली : जहाल महिला नक्षलवादी पोलिसांना शरण, १६ व्या वर्षी नक्षल चळवळीत…
बनवाबनवी करणाऱ्या टोळी सक्रिय
गेल्या काही महिन्यांपासून खोदकामात सोन्याचा हंडा सापडला आहे, सोने चमकून देतो, समोरच्या घरी चोरी झाली असून त्यामध्ये चोरी केलेले दागिने तुम्ही विकत घेतले आहे किंवा समोर पोलीस आहेत, गळ्यातील सोनसाखळी-पोथ रुमालात बांधून ठेवा, अशा प्रकारच्या शक्कल वापरून हातचलाखी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहे. या टोळीत काही महिलासुद्धा सहभागी आहेत. लहान दुकानदारांना त्यांनी लक्ष्य केले असून लुबाडणूक केल्यानंतर पसार होण्यात या टोळ्या पटाईत आहे.