नागपूर: अधिक मासातला श्रावण सुरु झालाय आणि काही दिवसातच मूळ श्रावण मासाला सुरुवात होईल. याच मूळ श्रावणाचे वेध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघाला लागलेय. एरवी मांसाहाराशिवाय इतर कुठलाही आहार न घेणारा वाघ चक्क गवत खातो आहे. वाघाचा गवताची पाती खातानाचा व्हिडिओ वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी टिपला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच प्रसिद्ध होत आहे.
अलिझंझा बफर गेटमधील “बबली” ही वाघीण आणि तिचे बछडे पर्यटकांना चांगलेच वेड लावत आहेत. याच बबलीच्या एका बछड्याला सध्या श्रावणाचे वेध लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरली आहे. जंगल तर पूर्णपणे हिरवेगार झाले आहे. कधी पाण्यात तर कधी हिरव्यागार गवतामध्ये ताडोबातील वाघ पर्यटकांना दृष्टीस पडत आहेत.
हेही वाचा… आरोग्य उपसंचालक पदाच्या परीक्षेत खुल्या वर्गावर अन्याय; किमान पात्रता गुणात अनियमितता झाल्याची…
बबलीच्या या एका बछड्याने चक्क गवताच्या पात्यांवर ताव मारत जणू श्रावणाचे वेध त्यालाही लागल्याचे सांगितले आहे. मडावी यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.