भंडारा : २०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांचा भाजपच्या टॉप १० कोट्यधीश खासदारांमध्ये समावेश असून सर्व पक्षीय खासदारांमध्ये ते ‘टॉप २५’ मध्ये आहेत. मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींची संपत्ती असून त्यापैकी सुनील मेंढे यांची ७२ कोटी तर शुभांगी मेंढे यांची संपत्ती २९ कोटींच्या घरात आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत सुमारे ३० कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी वर्षाला सरासरी ६ कोटी रुपये आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना अगदी शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षाने पुन्हा संधी दिली. त्यानंतर २७ मार्च रोजी शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काल लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करायचे होते. यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांमध्ये खासदार मेंढे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे चल-अचल अशी ७२ कोटी ५९ लाख ३,९६२ रुपयांची वैयक्तिक मालमत्ता आणि १ लाख ६० हजार ३२० रुपयांची रोकड आहे. पत्नी शुभांगी मेंढे यांच्याकडे २८ कोटी ९८ लाख ५३,६४२ रुपयांची संपत्ती आणि २ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम आहे. मेंढे यांची स्टेट बँकेत ४७ लाख ६६ हजार रुपये आणि ॲक्सिस बँकेत ४६ लाख ४१ हजार रुपये आहेत. याशिवाय टेकेपार, अजीमाबाद, आसगाव, खोकरला, शहापूर, भंडारा, भोजापूर, पवनी येथे जमिनी आहेत, ज्याची सध्याची किंमत १७ कोटी ४३ लाख आहे. याशिवाय भंडारा येथे व्यापारी संकुल व निवासी घर आहे. सुनील मेंढे यांच्यावर ६८ लाख २८ हजार रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नी शुभांगी मेंढे यासुद्धा कोट्यधीश असून यांच्याकडे ६० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी व १७ लाख रुपये किमतीची कार आहे. या कारचे १६ लाख रुपयांचे त्यांच्यावर कारलोन आहे. याशिवाय, मेंढे यांच्याकडे २० लाख १० हजार रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोने असतानाच त्यांच्या पत्नीकडे ६७ लाख रुपये किमतीचे सोने व १५ लाख रुपये किमतीचे हिरे आहेत.
हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण
विशेष म्हणजे, सन २०१४ मध्ये सुनील मेंढे यांनी प्रतिज्ञापत्रात ४२ कोटी ७३ लाख ८६ हजार ४९२ रुपयांची संपत्ती दर्शविली होती. तर २०२४ मध्ये त्यांनी ७२ कोटी ५९ लाख तीन हजार ९६२ रुपयांची संपत्ती दर्शविली आहे. यावरून मागील पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे २९ कोटी ८५ लाख १७ हजार ४७० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. याशिवाय रिंगणात असलेल्या काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे, बसपाचे संजय कुंभलकर, काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हेही कोट्यधीश उमेदवार आहेत.
हेही वाचा – बारामती, शिरूरमधील नाराजांच्या मनधरणीसाठी फडणवीसांची धावाधाव
डॉ. प्रशांत पडोळे यांची एकूण मालमत्ता ७ कोटी ५२ लाख २५९९ रुपयांची असून त्यात १ कोटी १२ लाख ५२ हजार रुपयांची जंगम आणि ६ कोटी ३९ लाख ५० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. बसपचे संजय कुंभलकर यांच्याकडे एकूण ५ कोटी ७३ लाख ३० हजार रुपयांची संपत्ती असून त्यात ३६ लाख ६५ हजार रुपयांची जंगम आणि ५ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्याकडे ७२ कोटी ५९ लाख तीन हजार ९६२ रुपयांची संपत्ती आहे. १० कोटी ८० लाख २९ हजार १९८ रुपयांची मालमत्ता असून त्यात ७६ लाख ४७ हजार ९८२ रुपयांच्या जंगम मालमत्तेचा आणि १० कोटी १२ लाख ८१ हजार २१६ रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. वंचित आघाडीचे संजय केवट यांच्याकडे २४ लाख ५५ हजार रुपयांची संपत्ती असून त्यांच्यावर ५८ हजार ५०० रुपयांचे कर्ज आहे.
हेही वाचा – वर्धा : शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा पक्षप्रवेश, उमेदवारीवर शिक्कामोर्तब
मग ‘ती’ ग्लुस्टर कोणाची ?
मेंढे यांनी नमूद केल्याप्रमाणे यांच्याकडे जुनी इनोव्हा असून तिची किंमत ५० हजार रुपये दाखविण्यात आली आहे. तर दोन ट्रॅक्टर व मोटारसायकल असून त्यांची किंमत पाच लाख ३० हजार रुपये आहे. मात्र ज्या ५० लाखांच्या ग्लुस्टरने मेंढे उमेदवारी अर्ज भरायला आले होते तिचा उल्लेख यात नसल्याने ती कार कुणाची अशी चर्चा रंगू लागली आहे.