नागपूर : कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर दोघांनी नव्याने संसार थाटला. परंतु, पत्नीचे पुन्हा एका युवकावर प्रेम जडले. पतीला कुणकुण लागताच पश्चातापामुळे नैराश्यात गेला. ती काही दिवसांपासून तणावात होती. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीला आपण दगा देत असल्याची तिची भावना झाली. त्यामुळे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना हुडकेश्वरमध्ये उघडकीस आली. अनुश्री (२३) असे मृत महिलेचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा कपड्याच्या दुकानात काम करायचा. त्याची ओळख हिंगण्यात राहणाऱ्या अनुश्रीशी झाली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि चॅटिंग करायला लागले. दोघेही प्रेमात पडले. दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांचा प्रेमविवाहास विरोध होता. त्यामुळे दोघांनी हिम्मत न हारता पळून जाऊन लग्न केले. दोघेही हुडकेशवर हद्दीत किरायाने घर घेऊन राहत होते. त्यांच्या लग्नाला ४ वर्ष झाले होते, मात्र त्यांना मूळबाळ झाली नव्हते. तर पती कामावर निघून गेल्यानंतर ती तासन तास फोन वर राहायची. दरम्यान, ती सूरज नावाच्या युवकाच्या प्रेमात पडली.
हेही वाचा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या बौद्धिक; शिंदे गटाचे आमदार काय करणार?
पती कामावर गेल्यावर दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. तो बिनधास्त घरी यायला लागला. त्यामुळे शेजाऱ्यांमध्ये अनुश्रीच्या अनैतिक संबंधाची चर्चा व्हायला लागली. तसेच अनुश्रीच्या मोबाईलमध्ये सूरजचे फोन येत असल्यामुळे अजयला दोघांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली. त्यामुळे, त्याने पत्नीची समजूत घातली, माफही केले.मात्र, नंतर तिला स्वत:ची चूक लक्षात आली. आपण जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीला दगा दिला, अशी तिची भावना झाली. यातूनच पश्चाताप होऊन तिने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हुडकेशवर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, पुढील तपास पोलीस करीत आहे.