लोकसत्ता टीम
चंद्रपूर: शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोरपना तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. त्याखाली दबल्याने वैशाली गोवर्धन उरकुडे (३५) यांचा मृत्यू झाला.
कोरपना तालुक्याला दुपारी प्रचंड वादळी पावसाचा तडाखा बसला. वडगाव येथे शेतात कामाला गेलेल्या वैशाली उरकुडे यांच्यावर झाड कोसळल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्या गावातील गुलाब जिवतोडे यांच्या शेतात कापूस बियाणे लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. जिवती, वरोरा, राजुरा या तालुक्यातही पाऊस झाला. कोरपना तालुक्यातील कढोली व परिसरातील अनेक गावांना या वादळाचा तडाखा बसला. यामुळे गावातील अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले.