यवतमाळ: केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयात अधिकारी असल्याची बतावणी करून तोतयासह यवतमाळातील एका महिलेने सात जणांना सव्वाकोटी रुपयांनी गंडा घातला. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशातील वाराणसी व लखनौत तळ ठोकून आरोपीची कुंडली बाहेर काढली.
तोतयाकडे कोटी रुपये किमतीच्या जुन्या दोन आलीशान कार असून, हायप्रोफाईल अधिकारी असल्याचे दाखविण्यासाठी तो याच कारने प्रवास करायचा.
गेल्या महिन्यात मास्टरमाइंड तोतया अधिकारी अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) याला नागपूर कारागृहातून हस्तांतरण प्रकियेत अटक करून आर्थिक गुन्हे शाखेने यवतमाळात आणले. सध्या तो कारागृहात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्याने यवतमाळातील मीरा फडणीस या महिलेच्या मदतीने सात जणांना एक कोटी ३३ लाखांनी गंडा घातला. अनिरुद्ध होशिंग याने आपण पर्यटन मंत्रालयात अधिकारी आहोत तर, मीरा फडणीस या महिलेने सदस्य असल्याचा बनाव केला होता.
हेही वाचा… अमरावती मध्यवर्ती कारागृहात भ्रमणध्वनी पाठोपाठ आढळला गांजा; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दोघांनी पर्यटन मंत्रालयाच्या अस्तित्वात नसलेल्या विविध योजनांत गुंतवणूक केल्यास जास्त उत्पन्न कमविण्याचे आमिष दाखविले होते. यवतमाळातील सात जणांचा विश्वास संपादन केला. पैसे दिल्यावर कोणत्याही योजनांबाबत करारपत्र केले नाहीत. पैसे मागितले असता, परतदेखील केले नाहीत. गैरमार्गाने आलेल्या पैशातून त्याने कोट्यवधी रुपये किंमतीच्या जुन्या आलीशान कार खरेदी केल्या. एक कार नागपूर पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्या घराच्या झडतीत एका कारची चाबी यवतमाळ पोलिसांच्या हाती लागली.
पथकाने वाराणसीतील शोरूमचा शोध घेतला. त्या ठिकाणी कार दुरुस्तीसाठी टाकली आहेे. त्याचाही खर्च लाखो रुपयांचा आहे. कोविडनंतरच्या काळात विमान प्रवासात त्याने एका केंद्रीय मंत्र्यासोबत फोटो काढला. तो फोटो लोकांना दाखवून आपण बडे अधिकारी असून, मंत्र्यांसोबत उठबस असल्याचेही भासवायचा. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र, जादा पैसे कमविण्याच्या आमिषामुळे हातात असलेल्या लाखोंच्या रकमेला मुकावे लागले आहे. पुढील तपास अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विशाल हिवरकर करीत आहेत.
श्रीमंतीचा ‘शॉर्टकट’ पडला महाग
होशिंग याच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. केवळ बारावीपर्यंत त्याचे शिक्षण झाल्याचे पालकांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला सांगितले. मात्र, आपले शिक्षण एमबीएपर्यंत झाल्याचे तोतयाचे म्हणणे आहे. हिंदी, इंग्रजी भाषा बोलण्यात निष्णात आहे. बोलताना कुणालाही सहज विश्वासात घ्यायचा. श्रीमंत बनण्यासाठी निवडलेला ‘शॉर्टकट’ कारागृहात घेऊन गेला.