नागपूर : शेतात कापूस वेचत असलेल्या शेतकरी महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. महिलेने प्रतिकार केला असता तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवानी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीनही नराधमांना अटक केली. आबू ऊर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभना (३५) ही महिला सुरेवानी गावातील रहिवाशी होती. तिच्या पतीला वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो सध्या कारागृहात असल्याने ती शेतीची कामे करत होती. घरी एकटीच राहत असल्यामुळे वासनांध आरोपी आबू ऊर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील यांची तिच्यावर वाईट नजर होती.
हेही वाचा >>> नागपूर : अविवाहित असल्याचे सांगून युवतीशी विवाह, जीम ट्रेनरवर बलात्काराचा गुन्हा
१२ जानेवारीला ती एकटी शेतात कापूस वेचत होती. दरम्यान, तिघेही तिच्या शेतात पोहचले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिला मारहाण करणे सुरू केले. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, शेजारच्या शेतांमध्ये कुणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. तिघांसमोर तिचा प्रतिकार टिकू शकला नाही. तिघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतरही ती प्रतिकार करीत असल्यामुळे तिघांनी तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करीत ठार केले.
काही वेळापर्यंत आरोपी तिच्याच शेतात लपून बसले. त्यानंतर एका नराधम आरोपीने रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या शोभा यांच्या मृतदेहावर पुन्हा बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडाचा गुन्हा खापा पोलिसांनी दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली आहे.