नागपूर : यशोधरानगरातील दोन महिलांनी एका २६ वर्षीय विवाहित महिलेला काम मिळवून देण्याच्या नावाखाली तिची गुजरातमध्ये विक्री केली. महिलेच्या दोन्ही मुली हिसकावून घेण्यात आल्या. त्या महिलेवर तब्बल ३६ दिवस तीन भावंडांनी दिवसरात्र सामूहिक बलात्कार केला. नरकयातनेत जीवन कंठत असलेल्या महिलेची मानवी अनैतिक तस्करी विरोधी विभागाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी सुटका केली. गुन्हे शाखेने सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पीडित २६ वर्षीय महिला दीप्ती (काल्पनिक नाव) ही पती व दोन चिमुकल्या मुलीसह यशोधरानगरात राहते. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे ती कामाच्या शोधात होती. तिचा पती मोलमजूरी करीत होता. मात्र, संसाराचा गाडा नीट चालत नसल्यामुळे त्याने मुंबईला कामासाठी गेला. दीप्ती ही मिळेल ते काम करून दोन्ही मुलींचा सांभाळ करीत होती. दरम्यान, आरोपी नंदा पौनीकर आणि मंगला वरकडे यांच्याशी ओळख झाली. दोघींनी दीप्तीची आर्थिक बाजू हेरून तिला एका महिन्यांचा किराणा भरून दिला. त्यानंतर दोघींचेही वारंवार घरी येणे सुरु झाले. नंदा आणि मंगला यांनी महिलेला गुजरातमधील जामनगर शहरातमध्ये एका श्रीमंत कुटुंबातील लहान बाळाला सांभाळायचे काम असल्याचे सांगितले. त्यासाठी २० हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तिने पतीची परवानगी घेतली आणि काम करण्यास होकार दिला. नंदा आणि मंगला यांनी २५ जुलै रोजी दीप्तीला दोन्ही मुलींसह नागपूर रेल्वे स्थानकावर नेले. त्यांच्यासोबत १७ वर्षांच्या दोन अन्य मुली होत्या. त्यांनाही काम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. दीप्तीला गुजरातमध्ये पोहचल्यावर संतोष (४५) नावाच्या युवकाच्या घरी नेले. दीप्तीच्या दोन्ही मुलींना हिसकावून घेत तिला धमकी दिली. दीप्तीला संतोषच्या गळ्यात हार घालून लग्न लावण्याचा बनाव केला.
हेही वाचा >>>“मराठा-ओबीसी वादामुळे अशांतता ,५० हजारांहून अधिक उद्योग ” काय म्हणाले पटोले
तिघांकडून दररोज सामूहिक बलात्कार
संतोषने दीप्तीला कुटुंबियांशी पत्नी असल्याची ओळख करून दिली. त्यानंतर पहिल्याच रात्री संतोष आणि त्याचे भाऊ गोलू (३२) आणि प्रतीक (३०) यांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर सलग ३६ दिवस तिघांनी आळीपाळीने दीप्तीवर बलात्कार केला. तिने प्रतिकार करताच मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. तिघांच्या अमानवीय अत्याचाराला कंटाळून दीप्तीने एका शेजारी महिलेच्या मदतीने पळ काढून नागपूर गाठले.
अशी आली घटना उघडकीस
दीप्तीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे दिली. त्यांनी महिलेला विश्वासात घेऊन घडलेला प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणात नंदा पौनीकर आणि मंगला वरकडे यांच्यासह बनावट पती संतोष, गोलू, प्रतिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त एम. सुदर्शन आणि सहायक आयुक्त श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, उपनिरीक्षक मंगला हरडे, गजेंद्र ठाकूर, सुनील वाकडे, दीपक बिंदाने, श्याम अंगथुलेवार, शरीफ शेख, विलास विंचूरकर आणि अश्विनी खोपडेवार यांनी केली.