एका वाहनाला धडकल्याने फेकल्या गेलेल्या दुचाकीस्वार महिलेचा मागून भरधाव आलेल्या बसखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना धंतोली पोलीस ठाण्याअंतर्गत काँग्रेसनगर येथे बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. शीतल विकास यादव (४३, रा. द्वारका अपार्टमेंट, पांडे लेआऊट, नागपूर) असे मृत महिलेचे नाव असून त्या महापालिकेच्या धंतोली कार्यालयात जन्ममृत्यू विभागात लिपिक म्हणून काम करत होत्या.
हेही वाचा >>>नागपूर: नागरिकांच्या जीवांशी खेळ?, रेशीमबाग मैदानात झुल्यांचे संचालन चक्क लहान मुलांकडे
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यादव या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी दुचाकीने महापालिकेच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या. काँग्रेसनगर येथे पोहोचताच योगेश मार्केटिंग नावाच्या दुकानासमोर (एमएच ३१/ डी १६९८) क्रमांकाचे टाटा एस वाहन उभे होते. या वाहनाच्या बाजूने त्यांनी दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी टाटा एस वाहनाच्या चालकाने त्याचा दरवाजा उघडला. त्यामुळे शीतल यादव यांची दुचाकी दारावर आदळली आणि त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी बसची त्यांना धडक लागली. बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी टाटा एस चालकावर गुन्हा दाखल करून केला आहे.
हेही वाचा >>>नागपूरकरांवर क्रिकेटचा ‘फिव्हर’, ३ हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात
शीतल यादव यांचे पती हे महापालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत होते. त्यांचाही १५ वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर शीतल यादव यांना अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत नोकरी मिळाली होती. अशाच प्रकारे अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.