लोकसत्ता टीम

यवतमाळ: मानसिक स्थिती बिघडल्याच्या अवस्थेत घर सोडलेली महिला तब्बल २० वर्षे देशात भटकत राहिली. या काळात तिचा मृत्यू झाला असे समजून तिच्या कुटुंबियांनी सर्व विधी उरकून घेत तिचा फोटोही घरात भिंतीवर टांगला. मात्र गेल्या आठवड्यात ‘ती’ अचानक तिच्या पश्चिम बंगाल मधील घरी पोचली आणि कुटुंबियांसह नातेवाईकसुध्दा अवाक झाले. यवतमाळ येथील ‘नंददीप’ फाऊंडेशनच्या माध्यमातून ही किमया घडली होती.

विमनस्क अवस्थेत घर सोडलेली ही महिला जिल्ह्यातील दिग्रस येथे पोहोचली. तेथील शिवाजी चौकात राहणार्याव मीराला ये-जा करणारे लोक नेहमीच बघायचे. ती कोणत्या गावची आहे, हे कुणालाही माहित नव्हते. आपण दिग्रसमधील रहिवासी आहे, असे ती सांगायची. लोकही शर्मा नावानेच तिला ओळखायचे. मीरा घरून रूसून आली असेल आणि रस्त्यावर झोपत असेल म्हणून कुणी विचारतही नव्हते. माझा मुलगा दिग्रस येथेच राहतो, असे सांगून ती वेळही मारून न्यायची. नंददीप फाउंडेशनची टीम दोन वेळा तिला आणायला गेली. मात्र, माझे घर येथेच आहे, असे सांगायची.

हेही वाचा… अमरावती: मेळघाटात आढळून आलेला ‘तो’ दारूसाठा बनावट, आंतरराज्‍यीय टोळीवर संशय

मात्र, घरता पत्ता सांगत नव्हती. अखेर चार महिन्यापूर्वी मीराला संदीप शिंदे यांनी बेघर निवारा केंद्रात आणले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी तिच्यावर उपचार केले. औषधोपचाराला प्रतिसाद मिळाल्याने ती बरी झाली आणि तिला पश्चिाम बंगालमधील घरही आठवायला लागले. १९ वर्षापूर्वी तिची मानसिक स्थिती बिघडल्याने घर सोडले. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतुत अत्यंत हलाखीचे दिवस काढले.

हेही वाचा… अकोला : पोलीस तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस; आई सतत रागवत, ओरडत असल्याने अल्पवयीन मुलाने…

मीराला बेघर निवारा केंद्रात आणण्यासाठी दिग्रसच्या पोलीस निरीक्षकांनीही मदत केली. मीरा बरी झाल्यावर तिला कर्जत येथील श्रद्घा फाउंडेशनच्या माध्यमातून घरी सोडायचे होते. त्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एका वाहनासह दोन पोलीस कर्मचारी दिले. श्रद्घा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पश्चि म बंगालमधील घरी तिला नेण्यात आले. ती घरी पोहोचली, तेव्हा भिंतीवर फोटो लावलेला होता. नातेवाइकांच्या लेखी मीरा मरण पावली होती. मात्र, तिला जिवंत असल्याचे बघून नातेवाइकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला बघण्यासाठी अख्खे गावच आले होते.

भटकंतीत १२ हजार रुपये जमवले

दोन दशके केलेल्या संघर्षमय प्रवासात मीराने पै-पै गोळा करून १२ हजार रुपये जमा केले होते. तिला बेघर निवारा केंद्रात आणले असता, ही रक्कम संदीप शिंदे यांच्याकडे जमा केली. त्या रक्कमेपैकी तीन हजार रुपयाच्या नोटा या पूर्ण जीर्ण झाल्या होत्या. मीरा घरी पोहोचली, त्यावेळी ही जमा पुंजीही तिच्या स्वाधीन करण्यात आली.

Story img Loader