अमरावती : सातपुडा पर्वतरांगांमध्‍ये अमरावती जिल्‍ह्यातील मोर्शी नजीक सुमारे १६ वर्षांपूर्वी अश्‍मयुगीन चित्रगुहा आढळून आल्‍यानंतर आता अभ्‍यास आणि संशोधनातून अनेक नवनवीन बाबी समोर येत असून या परिसरात वैदिक संस्कृतीपूर्वीचे अद्भूत शिवलिंग आढळून आले आहे. त्याची लाल रंगाने पूजा होत असल्याच्या स्पष्ट खुणा दिसतात, असा दावा संशोधकांच्‍या चमूने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील ज्‍येष्‍ठ संशोधक डॉ. व्ही.टी. इंगोले यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्‍या चमूला सातपुडा पर्वतराजीत २००७ मध्‍ये सुमारे १५ हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन चित्रगुहा आढळून आल्‍या होत्‍या. हा ठेवा सर्वप्रथम याच चमूने जगासमोर आणला होता. हा चित्रगुहेचा परिसर अमरावतीपासून जवळपास ८० किलोमीटर आणि मोर्शीवरून अंदाजे २० किलोमीटर अंतरावर आहे. आता १६ वर्षा नंतरही चित्रगुहेचा अभ्यास आणि संशोधनावरून अनेक महत्त्वाच्या बाबी पुढे येत आहेत. अनेक गूढ गोष्टी डोंगर कपारीत दडलेल्या असू शकतात. त्यातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे त्या परिसरात वैदिक संस्कृतीपूर्वीचे शिवलिंग आढळून आले आहे आणि त्याची लाल रंगाने पूजा होत असल्याच्या स्पष्ट खुणा दिसतात. एवढे पुरातन शिवलिंग असणे म्हणजे भारतीय इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असू शकते, असे संशोधकांचे मत आहे.

हेही वाचा – वादळी पावसाचा फायदा घेत नागपूरच्या अजनी वसाहतीतील शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड; महापालिकेकडून केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार

त्याच चित्रगुहेतील दगडावर कालभैरवाचे नृत्य करतानाचे तपकिरी रंगात चित्रही रेखाटले आहे. तसेच जवळील एक शैलगृहात पांढऱ्या रंगातील ‘ॐ’ आकृती आहे. आमचे याबाबतचे हे संशोधन संक्षिप्त असून ते खोलवर आणि व्यापक स्वरुपात होणे आवश्यक वाटते, असे संशोधकांनी सांगितले आहे.

यापूर्वी ‘मुंगसादेव’ नावाच्या चित्रगुहेतील शहामृग पक्ष्याच्या चित्रावर प्रसिद्ध संशोधक डॉ. व्‍ही. टी. इंगोले यांनी केलेल्या अभ्यास व संशोधन पत्रिकेवरून या चित्रगुहेतील अश्मयुगीन चित्रांचे वय १५ हजार वर्षांवरून ३५ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सर्वमान्य झाले आहे. भारतातील त्या काळातील ही अश्मयुगीन आदीमानवाची सर्वात मोठी आणि प्राचीन वसाहत असू शकते. कारण या भागात अश्मयुगीन, कांस्ययुगीन वसाहतीचे पुरावे आढळले आहेत. कोरीव तसेच तपकिरी आणि पांढऱ्या रंगातील चित्र तेथे आहेत. संशोधनाच्या दृष्टीने हा परिसर मौल्यवान आणि विस्तीर्ण असून त्यावर अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक आहे. तसेच या अतिप्राचीन वारशाचे संरक्षण करणेही अत्यावश्यक आहे. त्यामुळे ते विशिष्ट ठिकाण सद्यपरिस्थितीत गुप्त ठेवणे संयुक्तिक ठरेल, असे मत संशोधकांनी व्‍यक्‍त केले आहे.

हेही वाचा – हिंगणा: कारखान्याला आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

निसर्ग संशोधकांच्या चमूतील इतर सदस्य वन्यजीव लेखक प्र.सु. हिरूरकर, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे, कुमार पाटील आणि दिवंगत ज्ञानेश्वर दमाहे हे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A wonderful pre vedic shivling was found in satpura mma 73 ssb
Show comments