अमरावती : तू माझ्याशी लग्‍न कर, नाही तर मी तुझी गावामध्‍ये बदनामी करतो, अशी धमकी देत एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एमएससीला शिकणाऱ्या युवतीचा भर रस्‍त्‍यात हात पकडून छेड काढल्‍याची घटना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्‍की वानखडे (२३, रा. उदखेड, ता. मोर्शी), असे आरोपी युवकाचे नाव आहे. पीडित युवती ही चांदूर बाजार तालुक्‍यात राहणारी आहे. या युवतीची आरोपीसोबत एक वर्षापासून ओळख आहे. ती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एमएससीला शिकत होती. दोन महिन्‍यांपूर्वी एमएससीचा निकाल लागला. शिष्‍यवृत्‍तीच्‍या बायोमॅट्रिकसाठी तिला विद्यापीठात यावे लागले.

हेही वाचा – मॉलमधील कर्मचारी उभे राहून काम करतात..तेही १२ तास; काय आहेत अटी ?

२८ ऑगस्‍ट रोजी ती दुपारी १२ वाजताच्‍या सुमारास चांदूर बाजार येथून एसटी बसने अमरावतीत आली. त्‍यानंतर ती विद्यापीठात पोहोचली. प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीकडे ती पायी जात असताना आरोपी विक्‍की वानखडे हा त्‍या ठिकाणी आला. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्‍हणत त्‍याने बळजबरीने पीडित युवतीचा हात पकडला. ती घाबरली. तिने हात सोडविण्‍याचा प्रयत्‍न केला आणि तेथून निघून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी विक्‍कीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला.

हेही वाचा – मेळघाटच्या प्रतिबंधात्मक गाभा क्षेत्रात ‘वन्यजीव परिवारा’चे पर्यटन, वनविभागाचे नियम तुडवले पायदळी

तुला माझ्याशी लग्‍न करावे लागेल, अन्‍यथा तुझी गावात बदनामी करेल, अशी धमकी त्‍याने दिली. पीडित युवतीला शिवीगाळ केली. त्‍याचवेळी दोन अनोळखी युवक त्‍या ठिकाणी आले. त्‍यांना पाहताच आरोपी विक्‍कीने युवतीचा मोबाईल परत केला आणि तेथून निघून गेला. घाबरलेल्‍या अवस्‍थेत युवतीने वडिलांना फोनवर घटनाक्रम सांगितला. त्‍यानंतर मंगळवारी पोलीस ठाण्‍यात पोहोचून तक्रार दाखल केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man abused a young woman in amravati university area mma 73 ssb