नागपूर : प्रेयसी आणि तिच्या आईवडिलांनी युवकाला बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. बदनामीच्या भीतीने युवकाने कन्हान नदीच्या पात्रावरून फेसबुक ‘लाईव्ह’ करीत नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मनीष ऊर्फ राज रामपाल यादव (३५, मिनीमातानगर) असे मृत युवकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनीष यादव हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. त्याचे इलेक्ट्रिकल्स साहित्याचे दुकान आहे. मनीषची वस्तीत राहणाऱ्या काजल नावाच्या युवतीशी मैत्री होती. काही दिवसानंतर काजलने पैशासाठी प्रेमसंबंध ठेवले. काजल त्याच्याकडून हॉटेलमध्ये खर्च, मेकअपचे सामान, नवीन कपडे अशी मागणी करून पैसे उकळत होती. तसेच ती घरातील किराणा, आईवडिलांचा खर्चही मनीषकडून करून घेत होती. तिने आईवडिलांना मनीषबाबत माहिती दिली. काजल, तिचे आईवडील आणि एक छायाचित्रकार रमेश या चौघांनी कट रचून मनीष यादवला पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास काजलवर बलात्कार केल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गेल्या आठवड्याभरापासून मनीष तणावात जगत होता. त्याने पैशाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न केलेल्या गुन्ह्यात फसण्याची भीती त्याला होती. त्याने काजल व तिच्या आईवडिलांची समजूत घातली. मात्र, ते पाच लाख रुपयांच्या मागणीवर कायम होते. शेवटी मनीषने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – शिक्षक भरतीबाबत उदासीन प्रतिसाद, कारण काय?

हेही वाचा – चंद्रपूर : भरती रद्द करा! ५३३ अंगणवाडी सेविकांच्या भरतीत अर्थकारणाचा आरोप

मनोज यादवने कन्हान नदीवर जाऊन फेसबुक लाईव्हवर आपबिती कथन केली. त्यात काजल, तिचे आईवडील आणि रमेशने केलेल्या ५ लाखांच्या खंडणीची माहिती दिली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी धमकी दिली. त्यामुळे नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे. चौघांनाही फाशीची शिक्षा व्हावी, असेही त्याने चित्रफितीत म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man is threatened with rape complaint young man committed suicide in nagpur adk 83 ssb