लोकसत्ता टीम
बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झेंड्याच्या वादावरून एका युवकावर चाकूने वार करण्यात आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी आज, शनिवारी गुन्हे दाखल केले. या घटनेतील गंभीर जखमीला जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बुलढाणा उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
गिरोली येथे शुक्रवार, १४ एप्रिलला रात्री उशिरा जयंती मिरवणूक सुरू होती. रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी विकास मगरे (१९, रा. गिरोली बु.) हा झेंडा फिरवीत होता. यावेळी तिथे असलेल्या करण तांबेकर व अर्जुन तांबेकर (रा. गिरोली) यांनी विकाससोबत वाद घातला. विकास निळा झेंडा फिरवीत असताना करण याने विकासला झेंडा नंतर फिरव असे बजावले. यावर तुला काय अडचण? अशी विचारणा केली असता, आरोपी अर्जुन याने विकासच्या मानेजवळ चाकूने वार केला. यावेळी तिथे असलेल्या हर्षवर्धन देशमुख व स्वप्निल झिने यांनी त्याला सोडविले. जखमी विकासला अगोदर देऊळगाव राजा व नंतर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा…. VIDEO : “कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले”; अमरावतीत राणा दाम्पत्यासमोरच घोषणाबाजी!
या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आरोपी करण व अर्जुन तांबेकर या भावंडांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (२), (व्ही) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बुलढाणा उपविभागीय अधिकारी करीत आहेत.