यवतमाळ : शहरातील स्टेट बँक चौकात येथे तीन युवकांनी धारदार चाकूने हल्ला करून एका २५ वर्षीय तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. चेतन बाबाराव चित्रिव असे मृताचे नाव आहे. तो उमरसरा भागातील जगत मंदिर जवळ भाड्याच्या घरात राहत होता. चेतनचा खून नेमका कशातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले.
चेतनला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यवतमाळ शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात सातत्याने खूनाच्या घटना घडत आहेत. दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या वादातून रोशन मस्के याचा काही दिवसांपूर्वी खून झाला. यातील मुख्य सूत्रधार अजूनही सापडला नाही. चेतनला तिघांनी चाकूने भोकसल्याचे अनेकांनी पाहिले आहे, भर रस्त्यात सर्वसामान्य नागरिकांसमोर खुनाच्या घटना घडत असल्याने यवतमाळकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.