बुलढाणा: चिखली तालुक्यातील भरोसा गावासाठी काल सोमवार (दि. ६) ची रात्र काळरात्र ठरली. चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा शोध घेण्यासाठी उडी मारणाऱ्या युवकाचाही बुडून मृत्यू झाला. सुदैवाने उडी मारणारा अन्य युवक केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला. आज मंगळवारी सकाळी अंढेरा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
६ नोव्हेंबरच्या रात्री १० च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. यामुळे दिवाळीच्या तोंडावर गावासह चिखली तालुकाच नव्हे तर जिल्हा हादरला. शितल गणेश थुट्टे (२६) देवांश गणेश थुट्टे (१.९ वर्ष) आणि सिद्धार्थ निंबाजी शिरसाट(३६) तिघेही रा.भरोसा, ता चिखली अशी मृतकांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरा शितलने चिमुकल्या देवांश सह गावातील दिनकर जाधव यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नातेवाईक व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली.
हेही वाचा… जुन्या पेन्शनसाठी दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी सहकुटुंब रस्त्यावर उतरणार
दरम्यान, रात्री साडेदहाच्या आसपास सिद्धार्थ निंबाजी शिरसाट याने मायलेकांना बाहेर काढण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र, रात्रीचा अंधार आणि विहिरीतील गाळ यामुळे त्याचाही मृत्यू झाला. सिद्धार्थ दीर्घ वेळ पाण्याबाहेर आलाच नाही. त्यामुळे त्याला वाचवायला सुगदेव त्र्यंबक थुट्टे (५५) यांनी विहिरीत उडी मारली. ते कसेबसे पाण्यावर आले असता विहिरीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी टाकलेली दोर हाती लागल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी आज सकाळी स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. शव विच्छेदन साठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.