नागपूर : भेटीच्या बहाण्याने ऑटोचालक एका १७ वर्षीय तरुणीला त्याच्या सदनिकेत घेऊन गेला. तेथे जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि धमकावून परत आणून सोडले. तरुणीने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी ऑटोचालक अक्षय भैसारे नावाच्या आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे.
बेझनबागमध्ये राहणारी पीडित मुलगी एका रुग्णालयात नोकरी करते. ती ऑटोने रुग्णालयात ये-जा करीत होती. जवळपास महिनाभरापूर्वी तिची अक्षयशी ओळख झाली. त्याने तरुणीला त्याचा नंबर दिला. कधीही आवश्यकता असल्यास फोन करण्यास सांगितले. त्यामुळे रात्री ती ऑटोसाठी अक्षयला फोन करीत होती. त्यातून दोघांचे बोलणे वाढले. दोघेही एकमेकांच्या संपर्कात राहत असल्याने त्यांची मैत्री झाली. अनेकदा अक्षय ऑटोचे भाडेही घेत नसल्यामुळे ती वारंवार त्याला फोन करून घरी सोडून मागत होती. त्याने तरुणीला लवकरच त्याच्या लहान बहिणीचे लग्न होणार असल्याचे सांगितले. त्याने बहीण आणि कुटुंबीयांची तिच्याशी ओळख करून देण्याची इच्छा असल्याचे सांगितले. वारंवार आग्रह केल्याने तरुणी त्याच्या घरी येण्यासाठी तयार झाली.
हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात उपजत मृत्यू सर्वाधिक, तर बालमृत्यूमध्ये…
अक्षयने इटरर्निटी मॉलजवळून तिला त्याच्या ऑटोत बसवले. वाडी परिसरातील एका सदनिकेत घेऊन गेला. तेथे तिला शारीरिक संंबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिला धमकी देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. तरुणी या घटनेमुळे घाबरली होती. हिंमत करून तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. सीताबर्डी पोलिसात अक्षय विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अक्षयचा शोध सुरू केला आहे.