नागपूर : मैत्रिणीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या विवाहित काकाने बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी आरोपी काकावर गुन्हा दाखल केला. दिनेश आहाके (वाहिटोला, ता.रामटेक) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित २० वर्षीय तरुणी स्विटी (बदललेले नाव) तुमसर तालुक्यात राहते. ती नागपुरात पदवीचे शिक्षण घेते. महाविद्यालयातील एका तरुणीशी तिची मैत्री झाली. कौटुंबिक संबंध निर्माण झाल्याने मैत्रिणीने स्विटीला कार्तिक पौर्णिमेला गावी येण्याचे निमंत्रण दिले. नोव्हेबर २०२२ मध्ये स्विटी मैत्रिणीच्या घरी पाहुणी म्हणून आली. तिची जेवन आणि राहण्याची व्यवस्था मैत्रिणीचा काका दिनेश आहाके यांच्या घरी केली होती.
दिनेशची वाईट नजर स्विटीवर गेली. दिसायला सुंदर असलेल्या स्विटीशी दिनेश घरात एकटी असल्यास अश्लील चाळे करीत होता. परंतु, मैत्रिणीचा काका असल्यामुळे स्विटी गप्प होती. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दिनेश स्विटी झोपलेल्या खोलीत घुसला. त्याने तिचे तोंड दाबले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच दिनेशने तिच्यावर बलात्कार केला.
हेही वाचा – नागपूर : धक्कादायक! घरातच छापल्या बनावट नोटा, गेमिंग ॲपवर जुगार खेळण्याचे व्यसन
स्विटी ७ दिवस मैत्रिणीच्या घरी मुक्कामी होती. आरोपी दिनेशने तिच्याशी पाच वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती घरी परत गेल्यानंतर तिला गर्भवती असल्याचे कळले. परंतु, बदनामी होणार म्हणून तिने कुणालाही सांगितले नाही. ५ महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आई आणि बहिणीच्या लक्षात प्रकार आला. डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी गर्भपातास नकार दिला. त्यामुळे स्विटीला तिच्या आईने पुण्यात राहणाऱ्या बहिणीकडे नेले. तेथे ८ ऑगस्टला तिची प्रसुती झाली. तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाला वडिलाचे नाव मिळणार नाही, ही बाब लक्षात येताच तिने रामटेक पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी दिनेश आहाके फरार झाला.