अमरावती: एका तरुणीने मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी नवाथे चौकानजीकच्या रुळावर उघडकीस आली होती. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिने हा आत्मघाती निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गौरव मोरेश्वर हरणखेडे (२८, रा. रामेश्वर मंदिराजवळ, अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी सकाळी ईशा (१८, रा. महाजनपुरा, अमरावती) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने मुंबई-अमरावती एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली होती. ही घटना उजेडात आल्यावर राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठूनपंचनामा केला. सर्वप्रथम मृत तरुणीची ओळख पटविण्यात आली. ओळख पटल्यावर तातडीने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. शवविच्छेदनानंतर तिचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
हेही वाचा… नागपुरात नवीन डेंग्यू संशयितांची चाचणी होणार कशी? नवीन किट्स आल्या पण…
दरम्यान, ईशाच्या वडिलांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून गौरव हरणखेडेविरुद्ध तक्रार दाखल केली. कॉलेजमध्ये ये-जा करीत असताना एक मुलगा आपणास त्रास देत असल्याची माहिती तिने आपल्याला दिली होती. ८ सप्टेंबर रोजी मुलगी ईशा आपल्याला तणावामध्ये दिसली. त्यामुळे आपण तिला विश्वासात घेऊन कारण विचारले. त्यावेळी तिने गौरव हरणखेडे हा आपल्याला त्रास देत आहे. वारंवार फोन करीत आहे. महाविद्यालय, शिकवणी वर्ग व घराकडे चकरा मारत आहे. आपण त्याला समजावून सांगितले. तरीदेखील तो ऐकत नसल्याचे तिने आपल्याला सांगितले होते. गौरवच्या त्रासामुळेच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांनी तक्रार म्हटले. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरव हरणखेडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.