बुलढाणा : मित्राचा वाढदिवस वेगळया अन ‘थरारक’ पद्धतीने साजरा करण्याचा ‘सर्पमित्राचा’ प्रयोग त्याच्या मित्राच्या जीवावर बेतला. त्याच्या हातावर ठेवण्यात आलेल्या जहाल विषारी सापाने कडकडून दंश केल्याने एका युवकाचा करुण अंत झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मित्राचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा सध्याचे प्रस्थ किती घातक ठरू शकते याचा प्रत्यय आणणारा हा घटनाक्रम चिखली शहरात घडला. ही दुर्देवी घटना मागील पाच जुलै रोजी संध्याकाळी  साडे सात वाजेच्या सुमारास घडली. चिखलीतील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे (वय एकतीस वर्ष )  या युवकाचा  वाढदिवस पाच जुलै २०२४ ला होता. घरच्या मंडळींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण आणि गोडधोड करून संतोष चा वाढदिवस साजरा केला. पाच जुलैला सकाळपासून नातेवाईक, मित्र परिवार आणि शुभचिंतकानी संतोषला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा >>>पदाने मुख्यमंत्री, पण सर्वसामान्यांप्रमाणे प्रसादालयात भोजन….चिंतामणीसमोर नतमस्तक होताना….

 लाडक्या मुलाच्या वाढदिवस असल्याने  गजानन नगर मधील जगदाळे परिवाराच्या घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. गजानन नगर येथील  त्याचे दोन  मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. संतोषचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून या कथित मित्रांनी संतोषला बाहेर आणले. यामध्ये आरिफ खान रहीस खान आणि धीरज पंडितकर यांचा समावेश होता. यातील आरिफ खान रहिस खान हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप सोबत बाळगतो अशी चर्चा आहे.

संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरिफ व धीरजने त्यांच्या जवळील विषारी साप संतोषच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. यात चिडलेल्या त्या विषारी सापाने कडकडून दंश झाल्याने संतोष याची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, विषारी सापाचे जहाल विष अंगात भिनल्याने संतोष जगदाळे याचा दुर्दैवी अंत झाला. या अनपेक्षित घटनेमुळे आनंद साजऱ्या करणाऱ्या जगदाळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. काही तासापूर्वी आनंदाने न्हाऊन निघालेल्या घरात एकच  आकांत उसळला. तरणाताठा आणि भविष्यातील आधार असलेला मुलगा दगावल्याने जगदाळे परिवाराच्या शोकास पारावर उरला नाही.

हेही वाचा >>>बिबट शिकारीच्या मागे धावला अन्ं विहिरीत पडला, पण मग जे घडले…

 दरम्यान, या धक्क्यानंतर कसेबसे सावरल्यावर मृत संतोषचे वडील देविदास विठोबा जगदाळे (वय ७५, रा. गजानन नगर, चिखली, जि. बुलढाणा) यांनी आठ जुलै रोजी रात्री चिखली पोलीस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांना दुदैवी हकीकत सांगून  फिर्याद दिली. दोघेही संतोषच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस नायक मनोज मुळे यांनी प्रकरण दाखल करून घेतले. पोलिसांनी आरिफ खान रहिस खान, धीरज पंडितकर (दोन्ही राहणार गजानन नगर ,चिखली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच,तीन ( पाच) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

 या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भागवतकर करीत आहेत.या घटनेमुळे चिखली शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. मैत्रीच्या नावाखाली भलतेच काही करून मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या या दोघांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth died tragically after being bitten by a poisonous snake in buldhana scm 61 amy
Show comments