नागपूर:घरात एकटी झोपलेल्या महिलेवर एका ओळखीच्या युवकाने मुलासमोरच बलात्कार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अरबाज शेख नासीर शेख (२२, आझाद कॉलनी, ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला संजना (काल्पनिक नाव) ही विवाहित असून तिला सहा वर्षाचा मुलगा आहे. तिचा पती बेरोजगार असून दारुडा आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून ती मुलासह भाड्याने खोली करून राहते. आरोपी अरबाज हा कॅटरिंगचा व्यवसाय करतो.
हेही वाचा >>>राजीव दीक्षित यांचे बंधू प्रदीप दीक्षित यांना अटक; राजस्थान पोलिसांची वर्धेत कारवाई
त्याच्याकडे संजना ही कामाला जाते. त्यादरम्यान दोघांची ओळख झाली. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. संजना पतीपासून विभक्त राहत असल्याचे अरबाजला माहिती होते. त्यामुळे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तो संजनावर एकतर्फी प्रेम करायला लागला. मात्र, ती सहा वर्षांच्या मुलाच्या भविष्याचा विचार करत त्याला नकार देत होती. तरीही तो तिच्या पाठीमागे लागला होता. ती त्याला टाळत असल्यामुळे तो चिडलेला होता.मंगळवारी मध्यरात्री ती मुलासह झोपलेली होती. दरम्यान, आरोपी अरबाज हा मध्यरात्री दोन वाजता घरात घुसला. त्याने तिचे तोंड दाबले आणि रुमाल कोंबला. त्यानंतर तिच्यावर मुलासमोरच बलात्कार केला आणि पळून गेला. ती त्याचवेळी मुलासह नवीन कामठी पोलीस ठाण्यात पोहचली. तिचा अवतार बघून पोलिसांनी लगेच तिचे सांत्वन करून तक्रार ऐकून घेतली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अरबाजला अटक केली.