आमगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या किडंगीपार ते शिवणी नाल्यावरील रस्ता ओलांडताना चारचाकीसह तीन युवक वाहून गेले. सुदैवाने त्यातील दोघे बचावले, मात्र एक युवक अद्यापही बेपत्ता आहे. मोहन शेंडे (४२, रा.पदमपूर) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना १० आगस्टच्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. किडंगीपार ते शिवणी नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. अशा स्थितीत टाटा सुमो चालकाने हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चारचाकी वाहून गेली. वाहनातील दोन युवकांनी गाडीतून उडी घेऊन स्वत:चा जीव वाचविला परंतु चालक मोहन शेंडे हा गाडीतच अडकून वाहून गेला. बचावलेल्या युवकांनी घटनेची माहिती कुटुंबातील सदस्य व प्रशासनाला दिली. आमगाव पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी वाहन मिळाले मात्र मोहन शेंडे यांचा शोध लागला नव्हता.

Story img Loader