बुलढाणा: जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने एका १३ वर्षीय विद्यार्थीनिवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मलकापूर मार्गावरील बालाजी मंदिर परिसरात एका वाहनात त्याने हे दुष्कृत्य केले. सततच्या अत्याचाराने त्रस्त १३ वर्षीय पीडितेने अखेर तक्रार दाखल केली. बुलढाणा पोलिसांनी वासनांध शिक्षकाला अटक केली असून आरोपीची बोलेरो कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
गुरू शिष्य नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सतीश विक्रम मोरे (४१) असे नराधमाचे नाव असून तो मोताळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत शिक्षक आहे.
पिडीत विद्यार्थिनी गेल्या वर्षीपर्यंत तो ज्या शाळेत शिक्षक आहे त्याच शाळेत शिकत होती. गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने सध्या पीडित विद्यार्थिनी बुलढाणा शहरातील एका वस्तीगृहात राहून एका शाळेत शिक्षण घेत आहे.
हा दुर्देवी घटनाक्रम
१६ सप्टेंबर २००३ पासून सुरू झाला. पीडित मुलगी त्या दिवशी तिच्या शाळेत जात होती. सकाळी ११ च्या सुमारास सतीश मोरे हा बोलेरो कार घेऊन त्याच रस्त्याने आला. मुलीला थांबवून तिची विचारपूस केली व तुला शाळेत सोडतो म्हणत गाडीत बसवलं. मात्र गाडी शाळेजवळ जाऊनही मास्तरने गाडी थांबवली नाही. ” तुझे शाळेतल्या कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतांनाचे फोटो माझ्याजवळ आहेत, ते तुला दाखवायचे आहेत” असे म्हणत सतीश मोरे याने चारचाकी वाहन बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारजवळ नेली. तिथे उभी केल्यावर सतीश मोरे मागच्या सीटवर येऊन बसला. त्याने बदनामीची धमकी देत अत्याचार केला. नंतर वस्तीगृहाजवळ आणून सोडत, घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान पुन्हा ५ दिवसांनी सुरेश मोरे याने पीडित मुलीला तिच्या शिकवणी वर्गाजवळ गाठले. पुन्हा धमकावत एका सुनसान जागेवर नेऊन अत्याचार केला, असा प्रकार तीनदा घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.