बुलढाण्यातून खासगी बस (ट्रव्हल्स)मध्ये झोपेत असलेल्या १७ वर्षीय तरुणीवर बसच्या कंडक्टरने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. झोपेतून जागे झालेल्या तरुणीने आरडाओरड करीत प्रतिकार केला. त्यानंतर बसमधील अन्य प्रवाशांनी कंडक्टरला चोप दिला. बस थेट सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आली व याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज राजेंद्र सावंत (३०, रा. खामगाव, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित १७ वर्षीय तरुणी बुलढाण्यात राहणाऱ्या मावशीकडे गेली होती. ती आज सोमवारी पहाटे गगन ट्रव्हल्सने नागपूरला परत येत होती. ती एकटी असल्याची संधी साधून कंडक्टर सूरज सावंत याने तिच्याशी काही वेळ गप्पा केल्या. पहाटे तीन वाजताच्या सुमारात तरुणी झोपेत असताना तिच्याशी अश्लील चाळे करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ती झोपेतून खळबळून जागी झाली. तिने आरडाओरड केली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या चार ते पाच प्रवाशांनी सूरजला पकडले व त्याला चोप दिला.