राज्यातील महागद्दारांचे सरकार घोटाळेबाज असून या घटनाबाह्य सरकारच्या कार्यकाळात अनेक घोटाळे सामोरे येत आहेत. यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील अनेक उद्योग थेट गुजरातमध्ये पोहचले आहेत, अशी घणाघाती टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनेच लागणार. मध्यावधीमध्ये ४० खोकेबाजांना जनताजनार्दन पराभूत करून जमिनीवर आणणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊ, संभाजी महाराज, अहिल्यादेवींचे नाव लवकरच राष्ट्रपुरुषांच्या यादीत!

मेहकर येथील स्वातंत्र्य मैदान येथे सोमवारी पार पडलेल्या शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दाणवे, खा. अरविंद सावंत, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, बुलडाणा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख आशीष रहाटे, संजय हाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, राज्यातील सरकार व त्यांचे मंत्री घटनाबाह्य असून घोटाळ्यांना पेव फुटले आहे. अलीकडच्या काळातील ‘आनंदाचा शिधा’ हे याचे उदाहरण असून हा घोटाळा आम्ही बाहेर काढून सरकारला जाब विचारणार आहोत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- अकोला: गद्दारांचे घटनाबाह्य सरकार काही महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरे

राज्यातील अनेक उद्योग, प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर निघून जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साडे सहा लाख कोटी रुपयांचे उद्योग महाराष्ट्रात आले. मात्र, सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे यांच्या नाकाखालून वेदांतसारखे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. ज्या पक्षाने मोठे केले त्याच पक्षासोबत गद्दारी करून बंडखोरी करणारे आपल्या कृतीला उठावाची उपमा देत आहेत. हा उठाव असेल तर गुजरात मार्गे आसाममध्ये ते भित्र्यासारखे पळून का गेले? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा- नागपूर : युवक काँग्रेसची नागपूर ते तेलंगणा दुचाकी मिरवणूक

यावेळी त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ‘राक्षशी प्रवृत्तीचा घटनाबाह्य मंत्री’ असा उल्लेख केला. कृषी मंत्री वा अन्य सत्ताधारी बांधावर आले तर त्यांना देता (मदत) की जाता? एवढेच विचारा असे, आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. ‘चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे,’ अशी विधाने जिल्ह्यातील एका आमदाराने केली होती. त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी पाठीमागून वार केले नसते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray criticize shinde fadnavis government in buldhana dpj
Show comments