आजपासून ( १९ डिसेंबर ) राज्याचं हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात होत आहे. करोना संकटनानंतर पहिल्यांदाचा नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी सीमाप्रश्न, ओलादुष्काळ, राज्यातील प्रकल्प यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर घणाघात केला आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी आले असता नागपूर विमानतळावर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “सीमाप्रश्नावर कर्नाटकातून आक्रमक भूमिका घेतली जात असून, आपलं घटनाबाह्य सरकार काही बोलत नाही. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेलेत, त्यावरही उत्तर देण्यात आलं नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं, माझ्याशी माध्यमांसमोर येऊन चर्चा करावी. पण, अद्यापही ते झालं नाही,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
“दोन-तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना कोणताही मदत झाली नाही,” असे सांगत कर्नाटक प्रश्नी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सरकार घाबरट आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यावर आपले दोन मंत्री घाबरून तिकडे गेलेच नाही. हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.