३२ वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहे. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. सत्ताधारी मंडळीतील १४ लोकांना बोलू दिलं जातं. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. एनआयटी घोटाळा विधानसभेत काढून दिला जात नाही, असा आरोप शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.
विधिमंडळाबाहेर आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. नार्को टेस्ट करण्याची मागणी होत आहे, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “नाव घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही. या लोकांकडे मी लक्ष देत नाही. ३२ वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
“याच्यात दुखाची गोष्ट एकच वाटते, जी व्यक्ती हयात नाही. त्या व्यक्तीच्या आई-वडिल टीव्हीसमोर रडले बिचारे, त्यांचं दुख व्यक्त केलं. त्यांनी राष्ट्रपतींना या घाणेरड्या राजकारणाबद्दल लिहलं आहे. काही आमदारांनी त्यांची बदनामी केली आहे. हयात नसलेल्या व्यक्तीची बदनामी करायची. असं घाण राजकारण कधीच झालं नव्हते. तिच्या आई-वडिलांना राष्ट्रपतींकडे बदनामी थांबवा, अन्यथा जगू शकणार नाही, अशी मागणी केली,” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : दिशा सालियन प्रकरणाच्या SIT चौकशीची फडणवीसांनी घोषणा केल्यानंतर अजित पवार म्हणाले, “मग पूजा चव्हाण…”
“कधी हे लोक स्वत:च्या मुलांची बदनामी सहन करु शकतील का?, घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी कुठली पातळी उरली नाही का? विधानभवनात अशा प्रकरणाचं राजकारण कधी झालं नाही. हुकूमशाही सुरु आहे, पण घाबरलेत,” असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला आहे