गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न तापला आहे. त्यात मंगळवारी सीमाभागातील जमीन महाराष्ट्राचीच, असा ठराव विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. त्यापूर्वी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करावा, अशी मागणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

सोमवारी विधानपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझं मत आहे, जोपर्यंत हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तोपर्यत हा भाग केंद्रशासित करण्यात यावा. हा ठराव महाराष्ट्राने केला पाहिजे. ही मागणी आपण विधिमंडळाकडून केंद्र सरकारकडे पाठवली पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकाच्या मंत्र्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर कर्नाटकचे मंत्री जेसी मधुस्वामी यांनी पलटवार करत मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावा, असं सांगितलं. “मुंबईत २० टक्के कन्नड आणि कोकणी लोक राहतात. महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी मुंबई ही महाराष्ट्राचा भाग नव्हती. त्यामुळे बेळगाव नाहीतर मुंबईला केंद्र शासित प्रदेश करावे,” असं जेसी मधुस्वामी म्हणाले.

हेही वाचा : “तुम्ही पैसे घेऊन ‘पेड’ कार्यक्रम करता”, आरोपावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “मी जे…”

“कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत…”

जेसी मधुस्वामींना आता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबई ही महाराष्ट्राची असून, तिला केंद्रशासित प्रदेश करण्याची कोणाची हिंमत नाही. तसेच, कोणी करणारही नाही, कारण आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी उभे आहोत. देशात शांतता, कायदा सुव्यस्थेचे पालन करून एकता राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. वर्षानुवर्षे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. पण, आताच मुद्दा का काढण्यात आला? कारण, कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होत आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार व्यथित झालं आहे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray reply karnataka minister j c madhuswamy mumbai union territory ssa