अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळेंनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. सुशांत राजपूतच्या मृत्यूपूर्वी ‘AU’ नावाने रिया चक्रवर्तीला ४४ फोन करण्यात आले. ‘AU’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत सांगितलं. राहुल शेवाळेंनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गुरुवारी ( २२ डिसेंबर ) पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. “आदित्य ठाकरे सांगत आहे, माझा काही संबंध नाही. ३२ वर्षाचा तरुण सगळ्यांना पुरून उरला. अरे सत्तेचा दुरूपयोग करुन एका मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करणे हा कोणता पुरुषार्थ? एसआयटी चौकशी होऊद्या मग समजेल,” अशी टीका नारायण राणेंनी केली होती.
हेही वाचा : “आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी रात्री २ वाजता…”, नितेश राणेंचा दावा; अनिल परबांवरही केले आरोप!
नारायण राणेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर देत खिल्ली उडवली आहे. “शीशीशी त्यांच्याकडे आम्ही लक्षही देत नाही. त्यांनी एमएसएमईचा फुलफॉर्म अजून सांगितला नाही आहे. त्यांच्या घाणेरड्या राजकारणाबद्दल मी काडीमात्र उत्तर देणार नाही,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
नारायण राणे काय म्हणाले?
“दिशा सालियानची आत्महत्या नव्हे, हत्याच आहे, हे पहिल्या दिवसापासून मी सांगतोय. अडीच वर्षे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. आदित्य ठाकरेंना घटनास्थळी काही व्यक्तींनी पाहिलं सुद्धा होतं. तसेच, दिशा सालियानच्या पोस्टमार्टममध्ये फेरफार झाली होती. पण, आता उद्धव ठाकरेंची सत्ता नाही, त्यामुळे सर्व काही समोर येणार,” असं नारायण राणेंनी सांगितलं होतं.