चंद्रपूर : सीबीआयने रविवार १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले असल्याने त्याचा निषेध नोंदवत आम आदमी पक्षातर्फे येथे सत्याग्रह करण्यात आला. तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच सत्येंद्र जैन, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ताब्यात घेतलेले असताना आता अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्यामुळे याविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी ‘आप’चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात राज्यभर सत्याग्रह करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण, आरोग्य तसेच मोफत वीज पाणी व महिलांना मोफत प्रवास देण्याचे काम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेले असल्यामुळे त्यांच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात जनमान्यता मिळत आहे. त्यांच्या कामाची स्तुती होत आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला ‘आप’ देशभर वेगाने पसरत आहे. त्यामुळेच मोदी सरकार ‘आप’ला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे, असे यावेळेस जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : थेट प्रदेशाध्यक्षांपुढे आमदाराने मांडली व्यथा, म्हणाले मेहनत करणाऱ्या..

दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते. मोदी यांच्या काळ्या पैशांची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी यावेळेस केला. मोदी सरकार तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणा या दोघांच्या मदतीने विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करीत आहे. ज्या मद्य अबकारी धोरणाचा संदर्भ घेतला जात आहे, तेच मद्य विक्री धोरण पंजाबमध्ये जसेच्या तसे लागू करण्यात आले असून, तेथे तब्बल ४० टक्क्यांहून अधिक उत्पन्न वाढले आहे.

हेही वाचा – बुलढाणा : जळगाव तालुक्यात ‘एक दुजे के लिए’! प्रेमीयुगुलाने एका झाडावर, एकाच दोराने घेतला गळफास

गांधी चौक येथील आंदोलनात सुनील मुसळे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, मनोहर पवार विदर्भ कमिटी सदस्य, भिवराज सोनी संघटन मंत्री चंद्रपूर, नागेश्वर गंडलेवार संघटन मंत्री चंद्रपूर, संतोष दोरखंडे सचिव चंद्रपूर, मयूर राईकवार युवा अध्यक्ष चंद्रपूर, सुनीता पाटील महिला शहर अध्यक्ष, योगेश गोखरे शहर अध्यक्ष, राजू कुडे शहर सचिव, रवी पप्पुलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap satyagraha at chandrapur against central government rsj 74 ssb
Show comments