नागपूर : संजय राऊत ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून वक्तव्य करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे डोके तपासून घ्यावे. आतापर्यंत राऊत जे काही बोलले ते खरे झाले का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची टीका राज्याचे कृषी मंत्री व शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी केली. कृषी विभागाच्या बैठकीच्या निमित्ताने अब्दुल सत्तार नागपुरात आले असता ते बोलत होते.
संजय राऊत यांच्या बोलण्यावर उद्धव ठाकरे यांचे नियंत्रण राहिलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेली शिवसेना ही मुळातच बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे संजय राऊत बाळासाहेबांचे विचार सोडून वक्तव्य करत आहेत. त्यांचे तर आता डोके फिरले असून त्यांच्या मेंदूची तपासणी करुन घ्यावी, असा सल्ला सत्तार यांनी दिला. जोपर्यंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहेत, तोपर्यंत कुणीही किती धमक्या दिल्या तरी आमचे काहीही होणार नाही असेही सत्तार म्हणाले.
हेही वाचा… अमरावती : ऑनलाईन बदल्यांमधील अन्यायाच्या निषेधार्थ शिक्षकांचे आंदोलन
हेही वाचा… गारपीट व मुसळधार पावसाचे थैमान; तीन जनावरे ठार, शेकडो फळबागा उद्ध्वस्त
राधाकृष्ण विखे पाटलांशी आमची दोस्ती २५ वर्षांपासून कायम आहे, पण एकनाथ शिंदेंना बदलून विखे पाटलांना मुख्यमंत्री करा, असे मी म्हणालो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार सरकारमध्ये येणार की नाही हे माहीत नाही मात्र आले तरी त्यानंतर आमची भूमिका काय राहणार यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सावध राहा असे म्हटले असेल तरी ते शिंदे हे टायगर आहेत. सामान्यांचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही, असेही सत्तार म्हणाले.