नागपूर : शिवसेनेतील फुटीर गटाचे आमदार व शिंदे सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी सकाळी कॉंग्रेस नेते व माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी सध्याची अस्थिर राजकीय स्थिती बघता दोन आजी- माजी मंत्र्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तरानंतर शिंदे गटात अस्वस्थता आहे. काही आमदार मंत्री न होऊ शकल्याने तर काही मंत्रीपद मिळाल्यावर मनासारखे खाते न मिळाल्याने नाराजी आहेत. सत्तार सुध्दा कृषी खात्यावर समाधानी नाही. आज ते नागपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. त्यांनी सकाळी साडे आठ वाजता नितीन राऊत यांची भेट घेतली. पंधरा ते वीस मिनिटे या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी गेले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार व नितीन राऊत हे दोघे मंत्री होते. त्यापूर्वी सत्तार कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. गुरुवारी मुंबई हून नागपूरला येताना दोन्ही नेत्यांची विमानात भेट झाली. त्यावेळी राऊत यांनी सत्तार यांना घरी चहाला येण्याची विनंती केली होती, त्यानुसार आज सकाळी सत्तार तेथे गेले, अशी सुत्रांची माहिती आहे.

Story img Loader