नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन कायद्याने टिकेल असे आरक्षण देण्याचा शब्द मराठा समाजाला दिला आहे. त्यातही ओबीसीला धक्का न लावता त्यावर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा केली जात आहे. विरोधक मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सरकार पूर्ण प्रयत्नशील असून मराठा समाजाने मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवावा असे मत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
अब्दुल सत्तार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत त्यामुळे आरक्षणाचा प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढतील. राज्यसह देशातील वेगवेगळे प्रश्न असल्यामुळे त्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. त्या अनुषंगाने मराठा समाजासाठी टिकणारे आरक्षण देण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली असावी. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच सर्वांची इच्छा आहे.
लवकरात लवकरच या सगळ्यावर चर्चा होईल आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तिन्ही नेते मिळून एकत्रपणे ठरवतील असेही सत्तार म्हणाले. आत्महत्या हा पर्याय नाही. तिन्ही नेते आरक्षण देण्यासाठी तयार आहे, पण थोळा वेळ द्या असेही सत्तार म्हणाले. सर्व नेत्याना गाव बंदी केली आहे पण योग्य नाही. लोकप्रतिनिधीच्या कामात व्यक्ती स्वातंत्र्य जपू द्या त्यावर बंदी घालणे हा पर्याय नाही. संत्र्यावर प्रक्रिया करून निर्यात करण्यासाठी निर्णय घेऊ, प्रक्रिया होईल, कापूससाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना भाव वाढ मिळेल, सूतगिरणी याची पाहणी करून अडी अडचणी जाणून घेणार आहे. चांगल्या सूतगिरण्या पाहून अडी अडचणी समजून घेण्यासाठी जात आहे, त्या कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा बघितला जात नाही असेही सत्तार म्हणाले.