नागपूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणात आता एकनाथ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या हीना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत प्रसारित करून सर्व आरोप फेटाळले असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
आरोग्यसेवक भरती प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करीत असतानाच ‘टीईटी’ परीक्षेतही घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर काही जणांना अटकही करण्यात आली आहे. तसेच जे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून त्यांना ‘टीईटी’ परीक्षा देण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यामध्ये आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे ‘टीईटी’ घोटाळय़ातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बदनामीचा प्रयत्न – सत्तार
कोणीतरी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबाबत कायदेशीर कारवाई करणार आहे. काही चूक असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होईलच. या प्रकरणात माझ्या परिवाराची चूक असेल किंवा मी गैरफायदा घेतला असेल, तर मी गुन्हेगार आहे. मात्र, या यादीमध्ये ज्यांनी जाणीवपूवर्क माझ्या मुलींची नावे टाकली आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे अब्दुल सत्तार यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले.
गैरप्रकारात ७,८७४ विद्यार्थी
परीक्षा परिषदेने गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये ७,८७४ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना ‘टीईटी’ परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.
सत्तारांच्या दोन्ही मुलींची चौकशी करा : मनिषा कायंदे
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली टीईटी घोटाळयात अडकल्याचे उघड झाले आहे. त्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ़ मनिषा कायंदे यांनी गोंदिया येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत केली.