अकोला : नाव सत्तार आहे, त्याप्रमाणे राज्यात सत्ता कुणाचीही असो मी मंत्रिपदावर कायम राहिलो आहे. आपले राजकीय दुकान सुरूच आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी अकोल्यात केले. स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, ”राजकारणामध्ये सलग निवडून येणे अत्यंत कठीण आहे. राज्यपाल रमेश बैस तर लोकसभेमध्ये सात वेळा निवडून आले आहेत. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. १०० मतांनी सिल्लोड मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर सर्वप्रथम विधान परिषदेत निवडून आलो होतो. त्यानंतर २००९ पासून सलग तीन वेळा सिल्लोडमधून विधानसभेवर निवडून आलो आहे. माझे नाव सत्तार आहे. त्यामुळे या काळात सत्ता कुणाचीही असो, मी मात्र मंत्रिपदावर कायम आहे. आपले राजकारणातील दुकान सुरूच राहिले आहे.”
हेही वाचा – भंडारा: आकाश मार्गिकेच्या छताची टीनपत्रे उडू लागली अन् वाटसरुंच्या काळजाचा ठोका चुकला…
कुठल्याही पक्षात गेलो तरी सिल्लोड मतदारसंघातून मी निवडून येतो, असा सर्व्हे होता. शिवसेना पक्षात गेलो, त्यावेळी त्यांची मतदारसंख्या एक हजार होती. जुन्या पक्षाचे मतदान इकडे वळवले आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आलो. कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो. सगळ्यात वफादार प्राणी कुत्रा आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.