अमरावती : येथील जयस्‍तंभ चौकातील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळ्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावण्‍यात आल्‍याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाने या घटनेचा निषेध नोंदवला असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्‍यामुळे काँग्रेस कार्यकर्त्‍यांनी पोलिसांच्‍या भूमिकेवरही रोष व्‍यक्‍त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- काँग्रेसचे ६ ते ३१ मार्चदरम्यान राज्यव्यापी आंदोलन; १३ मार्चला ‘चलो राजभवन’; रायपूर अधिवेशनात निर्णय

बुधवारी रात्री पुतळ्यावर ‘अभाविप’चा झेंडा लावण्‍यात आल्‍याचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते समीर जवंजाळ यांच्‍या लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी लगेच त्‍याचे छायाचित्र काढून समाज माध्‍यमांवर प्रसारित केले. या प्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्‍यात तक्रार देण्‍यात आली, पण पोलसांनी तक्रार नोंदवून घेण्‍यासही नकार दिल्‍याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्‍यात आला आहे.

पुतळ्याच्‍या काठीला ‘अभाविप’चा झेंडा अडकविण्‍यात आल्‍याची माहिती सर्वत्र पसरली. त्‍यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने जयस्‍तंभ चौकात एकत्र आले. यावेळी युवक काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह पोलिसांचा निषेध नोंदवला. राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारच्‍या दबावाखाली आता अमरावती पोलीस काम करीत असल्‍याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी भैय्या पवार यांनी केला.

हेही वाचा- “फडणवीसांची नागपुरातील जागा धोक्यात”, चंद्रकांत खैरेंचा दावा; म्हणाले, “भाजपाची लबाडी..”

महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळ्याला आपला झेंडा लावण्‍याची वेळ ‘अभाविप’वर येते. ‘अभाविप’ने महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळ्याला त्‍यांचा झेंडा लावण्‍याऐवजी तिरंगा लावला असता, तर आम्‍ही त्‍याचे स्‍वागत केले असते, असे काँग्रेसचे पदाधिकारी वैभव वानखडे यांनी म्‍हटले आहे. स्‍वातंत्र्य चळवळीत कुठलेही योगदान नसलेल्‍या राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला महात्‍मा गांधी किंवा भगतसिंह, राजगुरू यांचे महत्त्व कधीच कळू शकणार नाही, अशी टीका वानखडे यांनी केली. पोलिसांनी कारवाई न केल्‍याबद्दल आम्‍ही निषेध नोंदवित असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा- बुलढाणा : “गद्दारांना धडा शिकवून ‘मातोश्री’वरील हल्ले रोखण्यास सज्ज व्हा”; सुषमा अंधारेंचे शिवसैनिकांना आवाहन

अभाविपचीही कारवाईची मागणी

दरम्‍यान, जयस्‍तंभ चौकातील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळ्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावण्‍यामागे कोण आहेत, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई व्‍हावी, अशी मागणी ‘अभाविप’च्‍या वतीने करण्‍यात आली आहे. तसे पत्रक संघटनेच्‍या वतीने काढण्‍यात आले आहे.